Sunday, November 11, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 22

चित्रपटसृष्टी......एक स्वप्ननगरी. लाखो तरुण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. पण,मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचे आईवडील स्टार असतात,ज्यांची मोठी लॉबी असते,ज्यांचा कुणीतरी गाﬞﬞडफादर असतो. त्यालाच चांगल्या भूमिका मिळतात किंबहुना तोच या चित्रपटसृष्टीत टिकतो. याची बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. परंतु, याला काही अपवाद आहेत. ज्याने फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. अशाच एका विश्वनाथचा हा संघर्षमय प्रवास.....

रायगड जिल्ह्यातील विश्वनाथ.
आईवडीलांची परिस्थिती सामान्यच.
लहानपणापासूनच नाटकात काम करायची आवड.

वयाच्या 13व्या वर्षापर्यंत सर्वकाही व्यवस्थित असतानाच वडिलांना त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान झाले. त्यातच त्यांना आपले घर, जमीन विकावे लागले आणि इथेच सुरु झाला विश्वनाथचा खरा संघर्ष.

वयाच्या 13 व्या वर्षीच भाकरीच्या चंद्रासाठी धावपळ सुरु झाली. महिन्याला 35 रुपये पगारावर चित्रपटाच्या पोष्टर रंगकामासाठी तो दररोज 16 किमी चालायचा. त्या 16 किमी च्या प्रवासात त्याच्या आयुष्याचे गणित इतके पक्के झाले कि, त्याच्या भविष्याचं कोडंच सुटलं.

तो कधी उपाशी झोपायचा. तर,कधीकधी दुपारी जेवणाच्यावेळी मुद्दाम हा मित्रांच्या घरी जायचा. जेणेकरून मित्र जेवणाचा आग्रह करेल आणि जेवायला मिळेल.

पुढे त्याला मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळाला. स्केचेस बनविण्यात इतका पक्का झाला कि, मुंबई पोलीस गुन्हेगारांची रेखाचित्रे याच्याकडूनच बनवून घेत असत.

जे.जे.मध्ये त्याच्यामधल्या अभिनेत्याला वाव मिळाला.

पण,चित्रपटसृष्टीत वशिल्याशिवाय काहीही चालत नाही.याचा प्रत्यय सलग 8 वर्षे आला.
पण, 8 वर्षाच्या संघर्षानंतर त्याच्या अभिनयाला न्याय मिळाला आणि “गमन” या चित्रपट काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या या पहिल्यावहिल्या ब्रेक चे याने सोनं केलं.

सहकलाकार, नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका करणारा,मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा तिरंगा फडकविणारा, तो क्रांतिवीर ठरला. तो विश्वनाथ म्हणजेच नाना पाटेकर.

35 रूपयांसाठी 16 किमी पायपीट करणारा विश्वनाथ ते नटसम्राट पर्यंतचा नानाचा प्रवास अनेक 'कोहराम', 'अंगार' यांनी भरलेल्या रस्त्यांचे 'टॅक्सी नं 9211' मधून 'वेलकम' करत होता. चित्रपटसृष्टीत कुणीही 'गाﬞﬞडफादर' नसताना हा 'परिंदा' हा 'युगपुरुष' खराखुरा 'यशवंत' बनला.

सेकंदाच्या आत Download होणाऱ्या 4G च्या जमान्यातल्या आजच्या पिढीला नानाचा हा संघर्ष पाहून लक्षात येईल कि, "यश ही अशी वस्तू आहे. जी सहजपणे Download होत नाही. त्यासाठी श्रमाचं Speed 4G असावं लागतं."


No comments: