Sunday, November 11, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 23

आयुष्य प्रत्येकाला संधी देत असतंच. ती शोधता आली पाहिजे. नशीब पालटायला ती एक संधी पुरेशी असते. पण, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. अशीच एक संधी मिळाली सोलापूरातील दुष्काळी भागातील एका तरुणाला आणि त्याने मिळालेल्या या संधीचे सोने कसं केलं ? त्याचाच एक खडतर प्रवास....

आजचा आपला यशवंत आहे बाळ्या.
जन्मताच अपंग. लंगडत लंगडत चालणारा.

सारं गाव त्याच्या या अपंगत्वावर हसायचं. पण, त्यानं ते हसणं कधी मनावर घेतलेच नाही.

बाळ्याचा जन्म दुष्काळी भागातील बेंबळे या गावात झाला.आईवडील शेतकरी. जेमतेम शेती. पण, दुष्काळामुळे साऱ्यांचेच हाल.

अपंग असूनही तो शेतीच्या कामात घरच्यांना मदत करायचा.

अपंगत्वावर मात करत, त्याने दहावीला 70 टक्के गुण प्राप्त केले. गावाजवळच्या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला.

दिवस असेच जात होते आणि अचानक त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आला.
एकेदिवशी त्याला एका मराठी  चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली. त्याने ती संधी सोडली नाही. त्यानं त्या संधीचं सोनं केलं. त्याला चित्रपटात काम मिळालं.

घरी अभिनयाचा वारसा नसतानाही, अभिनयाची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या बाळ्याने या चित्रपटात एका कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे काम केले आणि या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. त्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत तर धुमाकूळ घातलाच पण, देशांबरोबर परदेशालाही याड लावलं. हा याड लावणारा चित्रपट म्हणजे..सैराट आणि.. बाळ्या म्हणजेच लंगड्या,प्रदीप आणि प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे.

तानाजीने त्याच्या उत्तम अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्याने या व्यंगावर मात करत त्याच्यातील जबरदस्त अभिनय दाखवून दिला आहे. म्हणून तानाजी एक यशवंत आहे.

मी अपंग आहे.
मी गरीब आहे. 
लोकं काय म्हणतील?
तो माझा पिंड नाही.
या  सारखी अनेक कारणे तानाजी सांगू शकला असता. पण, जगाचं न ऐकता फक्त स्वतःचं ऐकलं आणि तो यशस्वी झाला.

म. गांधीजींच्या तीन माकडांपैकी, "बुरा मत सुनो।" अर्थात 'किकाजारू' या माकडाचा आदर्श घेतला तर, आपल्याला यश लवकर मिळेल. असा विश्वास वाटतो.


No comments: