आपण अवतीभवती अंध-अपंग लोकं पाहत असतो. त्यांच्या त्या दैननीय अवस्थेबद्दल कीव तर येतेच आणि देवाबद्दल प्रचंड रागही निर्माण होतो. याबरोबरच देवाने आपल्या नशिबी हे दुखः दिले नाही. याचेही भान होते आणि मग देवाबद्दलचा राग पुन्हा श्रद्धेत रुपांतरीत होतो. परंतु, तुम्हांला वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले, तर तुम्ही काय कराल ? कल्पना करता येत नाही ना ? आजच्या भागातील यशवंत जरासा वेगळा याचसाठी आहे. चला तर पाहूया या यशवंताचा संघर्षमय प्रवास.....
29 डिसेंबर 1970 रोजी महाबळेश्वरसारख्या थंडहवेच्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. किशोरवयीन जीवनापर्यंत आपल्या पुढ्यात काय वाढुन ठेवलंय? याची यत्किंचतही कल्पना त्याला नव्हती.
सर्वसामान्यासारखे आयुष्य जगत असतानाच शाळेतील फळ्यावरच काही दिसत नाही. असं हळूहळू त्याला जाणवायला लागल आणि काही दिवसातच त्याच्या जीवनात अंधार निर्माण झाला. तो पूर्णतः अंध झाला. अचानक आलेला हा धक्का कमी कि काय ह्यातच त्याच्या आईला कर्करोगाने ग्रासलं. आजारी आई आणि वडिलांची तुटपुंजी कमाई. संकटांची मालिकाच सुरुच राहिली. अंधत्व आले तरी त्या मुलाचा अभ्यास नेटाने सुरु होता. तो थांबला नाही. पुढे जातच राहिला.अगदी आई देवाघरी गेल्यावरही.....
शिक्षण पुर्ण केल्यावर पोटापाण्याच्या कामाचा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला. म्हणुन, त्याने NAB ह्या अंधलोकांच्या संस्थेत प्रवेश घेतला. सदर संस्था ही अंधांसाठी अनेक व्यवसाय पुरक शिक्षण अभ्यासक्रम चालवते आणि हा त्याच्या जीवनातील खरा टर्निंग पाﬞईट ठरला.
त्याला मेणबत्ती बनवायचे तंत्र शिकायची खुप इच्छा होती. मात्र NAB ने त्याला मसाज चे प्रशिक्षण दिले. त्याची जिद्द प्रचंड होती. त्याने मसाज चे प्रशिक्षण घेत असतानाच, मेणबत्ती शिकविणाऱ्या शिक्षकांना मोफत मसाज करुन, त्यांच्या त्यांनी कडून मेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसात केले.
केवळ 5000 रुपयांच्या भांडवलावर त्याने मेणबत्ती व्यवसायास सुरुवात केली. सुरवातीला एका हातगाड्यावरुन विक्रीची सुरवात करुन रोवलेल्या "सनराईज कॅन्डल्स" च्या व्यवसायाचे आज एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे आणि तो दिव्यांग म्हणजेच श्री.भावेश भाटीया.
श्री.भाटीया यांच्या संस्थेचे महाराष्ट्राबाहेर 13 राज्यांमध्ये शाखा असून 2 हजार 280 दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात 1 हजार 693 पुरूष आणि 587 महिलांचा समावेश आहे. स्वतः दिव्यांग असतानाही हजारो दिव्यांगांच्या जीवनात मेणबत्तीच्या रूपाने सूर्यप्रकाश आणला म्हणून श्री.भावेश भाटीया हे एक यशवंत आहेत.
दिव्यांग आहे म्हणून मिळणाऱ्या सहानभूतीच्या तुकडयावर जगण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्यावर श्री.भाटीया यांनी विश्वास ठेवला. म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरले आहेत. आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सांगण्यासाठी जादा कारणे आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वाने जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. ज्याप्रमाणे भाटिया यांनी दया मागण्याऐवजी त्यांनी संधी मागितली. त्याप्रमाणेच आपणही एखाद्या कडून दयेची अपेक्षा करण्या ऐवजी संधी ची अपेक्षा करूया. आणि स्वतःला सिद्ध करूया.
No comments:
Post a Comment