Monday, November 12, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 25

महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. पण,कधी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे तुमच्या ऐकण्यात,वाचण्यात किंवा पाहण्यात आले आहे का? नाही नक्कीच नाही. कारण, स्त्री असतेच अशी. आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार करणारी. भविष्याचा विचार करणारी. पतीच्या माघारी आपल्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धडपडणारी. आपल्या सैनिक पतीला आलेल्या हौतात्म्या नंतर त्याचे देशसेवेचे अपूर्ण राहिलेले स्वप्नं पूर्ण करणाऱ्या, एका वीरपत्नीचा हा प्रेरणादायी प्रवास....


आपल्या शेजारील राष्ट्राकडून वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि हल्ले यामुळे आजवर हजारो सैनिक शहीद झाले आहेत. यात साताऱ्याचेही कित्येक सैनिक आहेत, ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
नोव्हेंबर 2015 साताऱ्याचे एक सैनिक शहीद झाले. जे आपल्या कर्तृत्वाने सैन्यात मोठ्या पदावर पोहचले होते. जेंव्हा त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणले गेले. तेंव्हा त्यांच्या वीरपत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला. तिचा आक्रोश उपस्थितांना पहावेना. या दुःखद प्रसंगातही तिने मोठा निर्धार केला कि, “आपणही सैन्यात भरती व्हायचं आणि पतीचं देशसेवेचं अपूर्ण राहिलेलं स्वप्नं पूर्ण करायचं.”

वय वर्षे 38.
दोन मुलांची आई.
सैन्यात भरती होणे मुश्कीलच.
पण. त्या वीरपत्नीचा इरादा पक्का होता.

कसून तयारी केली.
स्टाफ सिलेक्शनची परीक्षा आणि लष्करातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून बेस्ट कॅडेड चं मेडल मिळवून ती एका वर्षातच भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाली. ती वीरपत्नी म्हणजेच शहीद लेफ्टनंट संतोष महाडिक यांची पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक होय.


आपल्या पतीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झपाटून काम करणाऱ्या, अफाट जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर मेहनतीच्या बळावरच लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी आपले स्वप्नं प्रत्यक्षात साकार केलं. म्हणूनच त्या खऱ्याखुऱ्या यशवंत आहेत.


माझे वय झालंय.
मी अबला आहे.
माझी दोन मुलं आहेत.
माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.
मी हे करू शकेन का?
या सारख्या प्रश्नांच्या जाळ्यात त्या अडकल्या असत्या, तर ' स्वाती महाडिक ' हे नाव कधीच विस्मृतीत गेलं असतं.


“स्वप्न पहा,निर्धार करा आणि ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा.” हाच यशाचा मंत्र लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या प्रवासातून आपणांस मिळतो आहे.


5 comments:

Madhu said...

Swati is a lady hence 'he' is used by mistake once please make the correction.

Inspirational real stories are always good..

Sandeep Patil, Dudhgaon said...

Thank you very much

YES ! I CAN !!! said...

Great

YES ! I CAN !!! said...

Great 👍

Mee lekhika said...

प्रेरणादायी