Friday, December 14, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 83

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 83*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एका देशाच्या 242 वर्षाच्या इतिहासात एकही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही. अशा राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचे स्वप्नं, एका महिलेने पहिले. ती महिला कोण ?? तिचं स्वप्नं पूर्ण झालं का ? काय तिचा संघर्ष ?? तिचीच ही प्रेरणादायी कथा..

26 ऑक्टोबर 1947 रोजी, तिचा जन्म शिकागो येथील एका कापड व्यावसायिक पित्याच्या पोटी झाला. काही कारणाने तिच्या आईला तुरुंगवास झाला. अशातच आईवडिलांचा घटस्फोटही झाला. त्यामुळे ती आजीकडेच लहानाची मोठी झाली. अशा या खडतर परिस्थितीत तिला मोठा काळ व्यतित करावा लागला.

1973 साली, तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले  आणि व्यवसायाला सुरूवात केली. मेहनतीच्या आणि बुध्दी कौशल्याच्या बळावर, अगदी थोड्या कालावधीत, ती एक यशस्वी वकील म्हणून नावारूपास आली. 1975 मध्ये तिने आपल्या कॉलेजच्या मित्रासोबतच प्रेमविवाह केला आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. नवरा अतिशय हुशार आणि धोरणी होता. समाजकार्याची त्याला विशेष आवड होती आणि त्यामुळेच तो राजकारणात ओढला गेला. 

1978 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तिचा नवरा एका राज्याचा गव्हर्नर बनला. देशाच्या राजकारणात तिच्या पतीची कमान उंचावतच राहिली आणि त्यामुळेच ती सुद्धा राजकारणात ओढली गेली. 1992 साली देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लागली. या निवडणुकीत तिने आपल्या पतीला निवडून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. तिचा पती राष्ट्राध्यक्ष बनला. तिने 8 वर्ष त्या देशाची ती फर्स्ट लेडी म्हणून काम पाहिले. या आठ वर्षात तिचं काम उल्लेखनीय होतं.

2000 आणि  2006 मध्ये तिने सिनेटची निवडणूक जिंकली. देशाच्या राजकारण तिने आपली वेगळी छबी निर्माण केली. 2008 मध्ये देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली.  या निवडणुकीसाठी तिने आपली दावेदारी सिद्ध केली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, उमेदवारी मिळविण्यात तिला अपयश आले.

2016 साली तिने पुन्हा आपली दावेदारी सिद्ध केली. यावेळी मात्र आपल्या पक्षाकडून  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यात, ती यशस्वी झाली. त्या देशाच्या 242 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, कोणत्याही पक्षाकडून एखाद्या महिलेला, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळाली. ज्या देशात इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर एका महिलेला उमेदवारी मिळाली, तो देश म्हणजे अमेरिका आणि जिने ही उमेदवारी मिळविली, ती महिला म्हणजेच हिलरी क्लिंटन होय.

आपण मोठं स्वप्नं पहिलं पाहिजे. त्याचा पाठलागदेखील केला पाहिजे. तुम्ही गरीब आहात ? कि श्रीमंत?  पुरुष आहात ? कि स्त्री ? काळे आहात ? कि गोरे ? हे अडथळे तुमच्या यशाच्या आड कधीच येत नाहीत. हिलरी यांनी देखील एक मोठं स्वप्नं पाहिलं. त्याचा पाठलाग केला. त्यांच्या या स्वप्नांच्या आड, वरीलपैकी कोणताही अडथळा आला नाही.

2016 च्या निवडणुकीत हिलरी यांचा पराभव झाला. त्यांचे प्रयत्न कमी पडले. हे खरं. पण, या पराभवातही त्याचा विजय लपला आहे. हे ही तितकंच खरं आहे. अमेरिकेतील एखाद्या राजकीय पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविणाऱ्या, त्या पहिल्याच महिला आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राजकारणात, एका महिलेने मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



2 comments:

आश्रमशाळा said...

nice story sandip

Janardan Chaudhari said...

सलाम तिच्या जिद्दीला, स्वप्नांना