Monday, December 17, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 86

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 86*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*शालेय जीवनात ' बकरीच्या आवाजाची ' म्हणून हिणविण्यात आलेल्या आणि अगदी लहान वयात अनेक अपयश पचवून, वयाच्या 19 व्या वर्षी, यशाला गवसणी घालणाऱ्या गायिकेच्या प्रवासाची, ही प्रेरणादायी कथा..*

2 फेब्रुवारी 1977 रोजी, एका कोलंबियन कुटुंबात तिचा जन्म झाला. अगदी 4 वर्षाची असताना, तिने पहिली कविता लिहिली. एक दिवस वडील तिला घेऊन एका हॉटेलमध्ये गेले. तिथे डॉम्बेक नावाचे एक पारंपरिक ढोल वाद्य वाजू लागताच, ती टेबलावर बेभानपणे नाचू लागली.  उत्तम दाद मिळाली आणि तिने त्याचवेळी एक प्रसिद्ध कलाकार व्हायचं पक्क केलं.

तिला कविता लेखनाबरोबरच गायनाची आणि नृत्याचीही आवड होती. ती शाळेच्या विविध स्पर्धात सहभागी व्हायची. तिला 'बकरीसारख्या आवाजाची' म्हणून चिडवलंही जायचं. पण, तरीही ती गातंच आवड राहिली. शाळाबाह्य स्पर्धात आणि विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन गाऊ लागली. थोड्या फार प्रमाणात प्रसिद्ध झाल्यामुळेच, एकेठिकाणी तिला ऑडिशन देण्याची संधी मिळाली. परंतु, तिचा परफॉर्मन्स निर्मात्यांच्या पसंतीस आला नाही. ती अपयशी ठरली. तरीही, तिला आणखी एक संधी मिळालीच. यावेळी मात्र, तिने मिळालेल्या संधीचे सोने केले. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना प्रभावित केले आणि सोबतच तीन अल्बमचा करार ही मिळविला.

पहिला अल्बम सपशेल अपयशी ठरला. दुसरा थोडा फार चालला. परंतु, व्यावसायिक दृष्ट्या तोही अपयशीच ठरला. त्यामुळे तिसरा अल्बम लांबणीवर पडला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत, तिने 2 अपयश पचविले होते. परंतु, तरीही प्रयत्न करणे थांबविले नव्हते. 

आलेल्या अपयशाने ती अधिक विचारी बनली. तिने स्वतःमध्ये, गायनामध्ये, लेखनामध्ये बदल केले. स्वतःचा नवा संगीत बँड बनविला. स्वतः संगीत देऊ लागली. तिचं धडपडणं सुरूच होतं. *यशाच्या शिखरावर पोहचलेल्या व्यक्ती, प्रयत्न करणं कधीच थांबवत नाहीत.* तिनेही हेच केले. त्यामुळे एके दिवशी, तिने  रेडिओवर प्रसारित केलेले एक गीत, तुफान लोकप्रिय झाले. यामुळे रखडलेल्या अल्बमसाठी कंपनीने गडबड सुरू केली. तिचा तिसरा अल्बम ‘पीएस देस्काल्ज़ोस’ प्रसिद्ध झाला. तो प्रचंड लोकप्रिय झाला. या अल्बम ने तिच्यासाठी संपत्तीचे, प्रसिद्धीचे, मानसन्मानाचे, स्वप्नंपूर्तीचे द्वार खुले केले. *वयाच्या चौथ्या वर्षी पाहिलेलं स्वप्नं, 19 व्या वर्षीच पूर्ण करणारी, ती गायिका म्हणजेच शकीरा अर्थात शकीरा इसाबेल मेबारक रिपोल.*

*शकीरा एक जगप्रसिध्द गायिका, नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. तिला ही ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला मोठे अपयश पचवावे लागले आहे. तिने या अपयशातून धडा घेऊन, स्वतःमध्ये बदल घडवून आणि प्रयत्न करूनच, यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे. आपल्याकडील परिस्थिती मात्र वेगळी आहे. आपली मुलं 10 वी नापास झाली अथवा कमी गुण मिळाले कि, पुन्हा - पुन्हा प्रयत्न करण्याचा मार्ग निवडण्याऐवजी, मृत्यू जवळ करतात.*

*शकिराला मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर, दोन वेळा ग्रॅमी आणि सात वेळा लॅटिन ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच, ती एक यशवंत आहे.*

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: