Monday, December 17, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 87

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 87*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*येमेन–मध्यपूर्व आशियातील, 2 कोटी लोकसंख्या असलेलं एक अरब राष्ट्र. याच राष्ट्रातील हुकूमशाही विचारसरणीच्या विरोधात, एका महिलेने आवाज उठविला. तिने अहिंसक मार्गाने संघर्ष केला. तिच्या  या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्या महिलेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...*

7 फेब्रवारी 1979 रोजी तिचा जन्म येमेनमधील एका शहरात झाला. तिने आपले पदवीचे शिक्षण राज्यशास्त्र या विषयात पूर्ण केले. 2005 साली तिने पत्रकार म्हणून, आपल्या कामाला सुरुवात केली. पण, त्याकाळी येमेन मध्ये पत्रकारांवर आणि विशेषत: महिला पत्रकारांवर, अनेक बंधने घातली गेली होती. स्वैर आणि मुक्तपणे त्यांना पत्रकारिता करता येत नव्हती. या विरोधात तिने आवाज उठविला.

या देशाचे राष्ट्रप्रमुख अली अब्दुल्ला सालेह यांची कार्यपद्धती हुकूमशाही होती. देशामध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अनेक प्रकारची बंधने लोकांवर घातली गेलेली होती. तेथील लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली गेली होती. म्हणून, तिने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केले.

तिचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, प्रसंगी साम–दाम–दंड–भेद या सर्वाचा वापर केला गेला. परंतु, तिने कशालाच भीक घातली नाही. त्यांनी दिलेल्या दीर्घ लढ्याचे फलित म्हणून, प्रदीर्घ काळ सत्तेत राहून, हुकमशहा बनलेल्या राष्ट्रप्रमुखाला पद सोडावे लागले. तिने देशात मोठी क्रांती घडवून आणली. म्हणूनच, तिला 'क्रांतीची जननी' व ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते. ती महिला म्हणजेच तवक्कुल करमन होय.

आपले ध्येय साध्य करण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी, व्यक्तीचा इरादा पक्का असणं गरजेचं आहे. 'जोपर्यंत मी यशस्वी होणार नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही.' असा इरादा तवक्कुल करमन यांचा होता. त्यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. प्रलोभनेही दाखविली गेली. त्या स्वतः एक महिला होत्या. तीन मुलांच्या आई होत्या. पण तरीही, त्या आपल्या ध्येयापासून किंचितही परावृत्त झाल्या नाही. कोणतंही बंधन आणि कोणतीही मर्यादा, त्यांना आपले ध्येय साध्य करण्यापासून अडवू शकल्या नाहीत. त्या आपलं ध्येय साध्य करूनच थांबल्या.

त्यांच्या या कार्याची दखल घेवून, 2011 साली त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. हा सन्मान मिळविणाऱ्या, त्या जगातील केवळ दुसऱ्या मुस्लिम महिला होत्या. शिवाय त्यावेळी त्या केवळ 32 वर्षांच्या होत्या. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

No comments: