Wednesday, December 19, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 88

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 88*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एकेकाळी आपल्या कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे, बेकरीमध्ये काम करावे लागलेल्या, एका महिलेचा ब्रिटेनच्या पंतप्रधान पदापर्यंतच्या  प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

1 आक्टोंबर 1956 रोजी, तिचा जन्म इंग्लंड मधील ईस्ट बोर्ड येथे झाला. तिचे वडील चर्चमध्ये पादरी होते आणि आई एक सामान्य गृहिणी होती. तिचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळांमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि आपला खर्च चालवण्यासाठी बेकरीमध्ये काम करावे लागले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. इथे तिच्या करिअरला आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. ती पदवीचे शिक्षण पूर्ण करून बँक ऑफ इंग्लंड मध्ये रुजू झाली. याच काळात तिने आपला मित्र फिलिप याच्यासोबत लग्न केले. 

पंधरा वर्षाच्या बँकेतील नोकरीनंतर, तिने राजकारणात प्रवेश करायचे पक्के केले. 1992 मध्ये, ब्रिटेनमधील कंजवेटीव (हुजुर पक्ष) पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेली. या निवडणुकीत तिचा सपशेल पराभव झाला. या पराभवानंतर तिने प्रचंड मेहनत केली आणि 1997 मध्ये खासदार म्हणून निवडून आली. हे यश म्हणजे भविष्यातील अनेक मोठ्या जबाबदाऱ्यांची नांदी होती. केवळ पाचच वर्षात म्हणजेच, 2002 साली, ती कंजवेटीव पक्षाची अध्यक्ष बनली. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर, केवळ दहाच वर्षात ती या पक्षाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली होती आणि कंजवेटीव पक्षाच्या इतिहासातील ती पहिलीच महिला अध्यक्ष बनली. परंतु, अजूनही तिच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण अजून येणे बाकी होता. तो क्षण आला, जून 2016 मध्ये. 

युरोपीय संघातून बाहेर पडावे ? की नाही ? यासाठी घेतलेल्या जनमत चाचणीत ब्रिटन च्या जनतेने बाहेर पडण्याचा निर्णय (ब्रिग्जिट) दिला. ‘ब्रिटेनने युरोपीय संघातून बाहेर पडू नये.’ या मताचे असणारे पंतप्रधान केमेरून व्हाईट यांनी राजीनामा दिला. देशासमोर संकटांची मालिका उभी राहिली. अशा परिस्थितीत देशाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी ती पुढे आली. पक्षांतर्गत विरोध आणि विरोधक या दोन्हींवर मात करत, वर्चस्व सिद्ध केले आणि ती ब्रिटनची पंतप्रधान बनली. ती महिला म्हणजेच थेरेसा मेरी मे होय. 

एका सामान्य कुटुंबातील महिला देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचू शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थेरेसा मेरी मे होय. 
समोर असलेल्या खूप मोठ्या संकटांना घाबरून मागे हटण्यापेक्षा, त्यावर मात करण्याचा, उपाय शोधण्यावर प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला घाबरून, शरण न जाता  संकटाला एक संधी समजून, सामोरे जाण्याची प्रेरणा मे यांच्या जीवन प्रवासातून मिळते. तुम्ही गरीब आहात का ? महिला आहात का ? या गोष्टी तुमच्या दृढ निश्चयापुढे नगण्य असतात. हेच मे यांनी सिद्ध केले आहे.

थेरेसा मेरी मे या ब्रिटनच्या राजकीय इतिहासातील, केवळ दुसऱ्याच महिला पंतप्रधान आहेत. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: