Thursday, December 20, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 89

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 89*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

लायबेरियातील एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या एका सर्वसामान्य महिलेचा, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

29 ऑक्टोंबर 1938 रोजी एलेनचा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी विवाह झाला. परंतु, हा विवाह फार काळ टिकला नाही. आपले कुटुंब चालविण्यासाठी एलेनने आपल्या पतीसोबत नोकरी करायची. एलेन अतिशय बुद्धिमान होती. त्यामुळे तिने आपले शिक्षण सुरू ठेवत, हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली.

एलेन च्या अफाट बुद्धिमत्तेमुळे तिची नियुक्ती लायबेरियाच्या अर्थमंत्रीपदी करण्यात आली. तिने दहा वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. 1980 मध्ये सैमुअल डो नावाच्या एका सैन्य अधिकाऱ्याने, लायबेरियाचे राष्ट्रपती टॉल्बर्ट यांची हत्या केली आणि देशाची सत्ता हस्तगत करून आपली हुकूमशाही प्रस्थापित केली. त्यामुळे एलेन सह अनेक नेत्यांना देश सोडावा लागला.

देशात अशांतता आणि अराजकता माजली. अनेक नेत्यांचे खून करण्यात आले. देशाला एकदा नव्हे तर दोन वेळा गृहयुद्धाला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. देशाची जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली. हुकूमशाही राजवटीची झळ देशातील प्रत्येकाला सोसावी लागली. पंचवीस वर्ष देशाला आणि देशातील लोकांना नरक यातना सहन कराव्या लागल्या.

लायबेरियातील नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, सन्मानाची वागणूक मिळावी, देशात शांतता नांदावी, लोकशाही प्रस्थापित व्हावी. यासाठी एलेन तब्बल पंचवीस वर्ष लढा देत राहिली. 1985 व 1997 साली झालेल्या निवडणुकांमध्ये तिने प्रयत्न केले. परंतु, तत्कालीन हुकूमशाही सत्तेमुळे आणि अपारदर्शक निवडणुकीमुळे तिला यश आले नाही. तिने पराभूत झाल्यावर आपली जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. प्रदीर्घ लढ्यानंतर 2005 साली झालेल्या पहिल्या लोकशाही निवडणुकीत एलेन विजयी झाली आणि ती लायबेरिया ची पहिली महिला राष्ट्रपती बनली. लायबेरिया ची पहिली महिला राष्ट्रपती म्हणजेच एलेन जॉनसन सरलीफ होय. 

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी चिकाटी फार महत्वाची आहे. त्यासाठी वेळ देणे, संयम राखणे, परिश्रम करणे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. देशाला अराजकतेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या आयुष्याची तब्बल पंचवीस वर्ष एलेन यांनी खर्च केलेली आहेत. मोठं यश मिळविण्यासाठी संघर्ष देखील मोठाच करावा लागतो. 

लायबेरियातील नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, सन्मानाची वागणूक मिळावी, देशात शांतता नांदावी, लोकशाही प्रस्थापित व्हावी. यासाठी एलेन यांनी शांतीपूर्ण मार्गाने प्रचंड प्रयत्न केले. यासाठी त्यांना 2011 साली, शांततेचे नोबेल पारितोषिक देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!




No comments: