🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 91*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
एका महिला टेनिस खेळाडूने, जागतिक क्रमवारीत तब्बल 8 वर्षे क्रमांक एकवर विराजमान राहण्याचा विक्रम केला. कोण ती खेळाडू? तिला हे कसं जमलं ? त्या महिला खेळाडूची ही प्रेरणादायी कथा...
14 जून 1969 रोजी, वेस्ट जर्मनीमधील मैनहेम नामक शहरात तिचा जन्म झाला. वडील टेनिस खेळाडू असल्यामुळेच, वयाच्या अगदी चौथ्या वर्षीच, तिच्या हातात टेनिसचे रॅकेट आले. यामुळे तिला टेनिसची प्रचंड आवडू लागले. काही दिवसातच तिने टेनिस खेळाला, आपले आयुष्य बनवले.
नियमित सराव आणि कठोर मेहनतीच्या बळावर, वयाच्या अठराव्या वर्षीच तिने अमेरिकेचे टेनिस जगतावरील वर्चस्व मोडीत काढून, जागतिक क्रमवारीत स्वतः क्रमांक एकवर विराजमान झाली. 1988 साली तिने चारही ग्रॅडस्लॅम जिंकून टेनिस जगतामध्ये हाहाकार माजवला. ती तब्बल 186 आठवडे क्रमांक एकवर विराजमान होती.
1991 साल, तिच्यासाठी खुपच संघर्षात्मक होते. तिला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. याच काळात तिच्या वडीलांना कर चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. त्यांना तीन वर्षाचा कारावास भोगावा लागला. या प्रकरणाचा तिला मानसिक धक्का बसला. याचा परिणाम खेळावर झाला. त्यामुळे तिच्या मानांकनात घसरण होऊन, तिला नंबर 1 वरून पायउतार व्हावे लागले.
1993 मध्ये मोनिका सेलेस या खेळाडू विरोधात खेळताना, तिच्या एका चाहत्याने मोनिकावर चाकू हल्ला केला. या प्रकरणाचा तिच्यावर मनावर गंभीर परिणाम झाला. त्यामुळेही तिला अनेक सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. परिणाम स्वरूप क्रमांक वरखाली होऊ लागले.
सर्व मानसिक धक्क्यातून, दुखापतीतून स्वतः ला सावरत, 1997 साली ती पुन्हा सर्वोच्च स्थानी विराजमान झाली. यावेळी तिने सर्वाधिक काळ क्रमांक एकवर विराजमान असण्याचा मार्टिना नवरातिलोवा चा विक्रम मोडला आणि 377 आठवडे क्रमांक एकवर विराजमान राहण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. असा पराक्रम करणारी, ती महिला टेनिस खेळाडू म्हणजे स्टेफी ग्राफ.
आपल्या ध्येयावर आपले लक्ष केंद्रित असेल, तरच आपणांस ध्येय गाठता येते. ध्येयप्राप्तीच्या मार्गावर अनेक शारीरिक आणि मानसिक संकटं आपल्यासमोर उभी राहतात. परंतु, त्या संकटांना आडवे करून मार्गक्रमण करणारे यशस्वी होतात. स्टेफी ग्राफ यांनी फॅशन, रोमान्स, जाहिरात आणि कायम चर्चेत राहण्यासाठी वाद निर्माण करणे. याबाबींकडे लक्ष देण्याऐवजी, खेळावर अधिक लक्ष केंद्रित करायच्या. म्हणूनच, त्या जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ क्रमांक एक वर विराजमान होण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर करू शकल्या.
1999 साली स्टेफी ग्राफ यांनी निवृत्ती घेतली. त्यावेळी त्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. इतक्या उत्तम क्रमवारीवर असताना निवृत्त होणाऱ्या, त्या एकमेव आहेत. म्हणूनच एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
No comments:
Post a Comment