Sunday, December 23, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 92

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 92*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच अपघातात अपंगत्व आलेल्या आणि भीतीवर मात करीत यशवंत बनलेल्या, आपल्या शेजारच्या राष्ट्रातील, एका विवाहित मुस्लिम तरुणीचा प्रेरणादायी प्रवास...

3 मार्च 1987 रोजी, पाकिस्तानातील एका रूढीवादी, परंपरावादी बलोच परिवारात तिचा जन्म झाला. आपल्या वडिलांच्या आनंदासाठी काहीही करायला सदैव तयार असणारी ती एक चांगली मुलगी. तिला चित्रकार बनायचे होतं. परंतु, तिने आपल्या वडिलांच्या इच्छेखातर वयाच्या अठराव्या वर्षी लग्न केलं. 

लग्न होऊन जेमतेम दोन वर्षे झाली असावीत. पतीसोबत कारमधून प्रवास करत होती. पतीला झोप आल्याने, गाडीवरील ताबा सुटला. स्वार्थी पतीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी, गाडीतून उडी मारली. या अपघातात त्याला फारसे काही झाले नाही. मात्र, तिला जबर दुखापत झाली. पाठीला जबर मार बसल्याने कायमचे अपंगत्व आले. शिवाय, ती कधीच चालू शकणार नव्हती आणि ती कधीच चित्र काढू शकणार नव्हती आणि कहर म्हणजे ती आता कधीच आई होऊ शकणार नव्हती. 

पहिल्या दोन धक्क्यांचे तिला फारसे दुःख झाले नाही. परंतु, आई होऊ न शकण्याचे तिला फार दुःख झाले. आपल्या जीवनात काही अर्थच नाही. असे तिला वाटू लागले. पण, या धक्क्यांबरोबरच आणखी एक धक्का तिच्या पतीने तिला दिला....तो म्हणजे तलाक.

दवाखान्यातील बेडवर, तिला वाटत असलेल्या भीतीचा विचार करत बसली होती. आपल्याला वाटत असलेल्या भीतीवर मात करायचं तिनं पक्कं ठरवलं. डॉक्टरांनी तिला सांगितले होते की, "तुला चित्र काढायला जमणार नाही." पण,
"आपण चित्रे काढायचीच." या इराद्याने ती बेडवरच कामाला लागली. ती चित्र काढू लागली. तिचा आत्मविश्वास वाढला. तिची चित्रं लोकांना आवडू लागली. ती पाकिस्तानातील प्रसिद्ध चित्रकार बनली. ती प्रसिद्ध चित्रकार म्हणजेच मुनिबा मजारी.

मुनीबा कधीच चालू शकणार नव्हती. परंतु, तिने व्हीलचेअरला आपली कमजोरी बनू दिले नाही. तिचे शरीर व्हीलचेअरचे गुलाम होते पण, तिचे मन आणि तिची स्वप्नं नव्हती. चित्रकार होण्याचं स्वप्नं पूर्ण केलं. नवऱ्याला दुसऱ्या विवाहासाठी शुभेच्छा दिल्या. मूल दत्तक घेऊन आई बनली. वाटत असलेल्या प्रत्येक भीतीवर, इच्छाशक्तीच्या बळावर तिने उपाय शोधला. 

आज मुनिबा पाकिस्तानातील एक प्रसिद्ध चित्रकार, मॉडेल, गायक, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रेरणादायी वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे. तिला हे शक्य झाले, ते केवळ तिने केलेल्या विचारांमुळे. सर्वांच्याच जीवनात कमी आधी–प्रमाणात संकटं असतातच. कदाचित, सर्वानांच भीती वाटत असावी. कदाचित, सर्वच संकटांना घाबरून रडत असावेत.परंतु, जी लोकं पराभव स्वीकारण्याचा, शरण जाण्याचा, पळ काढण्याचा मार्ग निवडतात. ती अपयशी होतात. याऊलट सामोरे जाण्याचा, लढण्याचा मार्ग निवडणारेच यशवंत होतात. नेमकं मुनिबाने आपल्या समोरील परिस्थितीला, तिला वाटत असलेल्या भीतीला सामोरे जाण्याचा, लढण्याचा मार्ग निवडला.

BBC ने मुनिबाची 2015 साली, जगातील टॉप 100 महिलामध्ये निवड केली आहे. शिवाय, तिला पाकिस्तानमध्ये  ' आयर्न लेडी ' म्हणूनही ओळखले जाते. म्हणूनच ती एक यशवंत आहे.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!





No comments: