Monday, December 24, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 93

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 93*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

आपली आवड जपणाऱ्या, एका छंदवेड्या तरुणीच्या आगळ्यावेगळ्या प्रवासाची ही प्रेरणादायी कथा...

तिचं नाव वेलेनटिना. तिचा जन्म 6 मार्च 1937 रोजी रशियातील एका खेडेगावात, एका अतिशय सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. दोन वर्षाची असतानाच, तिच्या वडिलांना दुसऱ्या महायुद्धात मरण आले. तिची आई मोठी कष्टाळू अन् हिंमती होती. तिने तीनही मुलांचा उत्तम सांभाळ केला. आईचे हेच गुण वेलेनटिनामध्येही उतरले.

वेलेनटिना वयाच्या आठव्या वर्षापासून शाळेत जाऊ लागली. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी, केवळ आठच वर्षात तिने औपचारिक शिक्षणास रामराम ठोकला आणि आईसोबत कापड कारखान्यात काम करण्यासाठी जाऊ लागली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. कालांतराने तिने बहिस्थ शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

याच कालावधीत, तिला स्काय डायव्हिंग, पॅराशुट जंपिंग या सारख्या साहसी प्रकारात आवड निर्माण झाली. तिने आपली आवड जोपासायचे ठरवले. यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तिची तयारी होती. तिने कंपनीत जादावेळ काम करून, पैसे साठविले आणि प्रशिक्षणही घेतले. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, तिने आपली पहिली उडी मारली.

12 एप्रिल 1961 रोजी रशियाने आपला पहिला अंतराळवीर युरी गागारीन अवकाशात पाठविला. यानंतर, अमेरिका आणि रशिया यांच्यात अंतराळ मोहीम स्पर्धाच सुरू झाली. रशिया आपल्या पुढील अवकाश मोहिमेची तयारी करत होता. यावेळी पुरुषा ऐवजी महिला अंतराळवीर पाठविण्यावर विशेष भर होता. अर्ज मागविले गेले. तिनेही अर्ज केला. तब्बल 400 अर्ज आले. यामधील उत्तम 5 महिलांमध्ये तिची निवड झाली. या उत्तम 5 पैकी, सर्वोत्तम अशा एकाच महिलेची या अंतराळ मोहिमेसाठी निवड होणार होती. तिने आपली दावेदारी सिद्ध केली आणि या अंतराळ मोहिमेसाठी निवडली जाणारी, ती सर्वोत्तम महिला ठरली. ती सर्वोत्तम महिला म्हणजेच वेलेनटिना तेरेश्कोवा.

16 जुन 1963 रोजी VOSTOK 6 या अंतराळयानातून वेलेनटिना यांनी अवकाशात भरारी घेतली. त्या अंतराळात 2 दिवस, 22 तास, आणि 50 मिनिटे होत्या. या कालावधीत त्यांनी 48 पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्या.

वेलेनटिना यांची अंतराळ मोहिमेसाठी निवड होण्यामागे केवळ एकच कारण आहे, त्यांनी जपलेली आवड. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही, त्यांनी आपली आवड जोपासली, प्रसंगी OverTime केला. पण, आपला छंद, आपली आवड जपली. 

वेलेनटिना यांनी जपलेल्या आवडीमुळेच, त्यांना जगातील पहिली महिला अंतराळवीर होता आले. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.





No comments: