Tuesday, December 25, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 94

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 94*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*टेनिस खेळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या, पहिल्या रशियन महिला खेळाडूच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...*

19 एप्रिल 1987 रोजी तिचा जन्म रशियातील सैबेरियन प्रांतातील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच  तिला टेनिस खेळाविषयी विशेष आवड निर्माण झाली. 

तिची टेनिस या खेळामधील आवड पाहूनच वडिलांनी अत्यंत खर्चिक असलेले प्रशिक्षण जीवाचे रान केले आणि पैसे जमा केले. त्यांनी यु. एस. मधील फ्लोरिडा शहरातील, एक प्रसिद्ध ॲकॅडमी गाठली. तिचे वय कमी असल्याने तिला प्रवेश मिळाला नाही. परंतु, वडिलांनी जिद्द सोडली नाही. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर तिला प्रवेश मिळाला. आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे ठरवून, तिने मनापासून टेनिस ची प्रॅक्टिस केली. तासन् तास सराव केला आणि टेनिस मधील बारकावे समजून घेतले.  

ती वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत अनेक स्पर्धात यशस्वी झाली. 2004 साली वयाच्या केवळ 17 व्या वर्षीच विम्बल्डन चा मानाचा खिताब आपल्या नावे केला आणि साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. 2006 साली यु. एस. ओपन जिंकून जगातील टॉप ची टेनिस खेळाडू बनली.

अशातच, तिला खांद्याची दुखापत झाली.तिचे अग्रस्थान ही डळमळले. तिने शस्त्रक्रिया केली. त्यामुळे, काही काळ टेनिसपासून दूर रहावे लागले. यामुळे ती जागतिक क्रमवारीतून पहिल्या 100 मधूनही बाहेर फेकली गेली. दुखापतीतून सावरून, तिने पुन्हा कसून मेहनत केली. आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर 2009 च्या शेवटी तिने पहिल्या वीस मध्ये स्थान मिळवले. 2012 साली चारही ग्रँडस्लॅम जिंकणारी जगातील ती  केवळ 10 वी महिला बनली. शिवाय, या विजयानंतर तिने आपले पहिले स्थान पुन्हा प्राप्त केले. असा पराक्रम करणारी ती पहिलीच रशियन ठरली. ती स्टार टेनिस खेळाडू म्हणजेच मारिया शारापोव्हा.

दुखापतीमुळे बिघडलेली कामगिरी आणि त्यामुळे ढासळलेली क्रमवारी यामुळे मारियाला मोठ्या नैराश्याला सामोरे जावे लागले. परंतु, दुखापतीतून सावरल्यावर, तिने नैराश्याला देखील बाजूला सारले. तिने नव्या उमेदीने, नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. आपल्या मेहनतीच्या बळावर तिने आपले पहिले स्थान पुन्हा मिळविले. 

यशाच्या शिखरावर विराजमान असताना, बऱ्याचवेळा पायउतार व्हावे लागते. काहीवेळा स्वतःमुळे, तर काहीवेळा हितशत्रूंमुळे. परंतु, पराभव न पत्करता, ना उमेद न होता, संघर्ष केला तर आपण पुन्हा एकदा आपले स्थान प्राप्त करू शकतो. 2016 साली मारियाला डोपिंग सारख्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. परिणामी,तिला जागतिक टेनिस क्रमवारीतून हद्दपार केले गेले. परंतु, पराभव न पत्करता, ना उमेद न होता, तिने मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर, काही दिवसातच पहिल्या 30 मध्ये स्थान मिळवले. म्हणूनच,ती एक यशवंत आहे.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: