Tuesday, December 25, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 95

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 95*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एक प्रश्न विचारू का?? तुम्हाला अंतराळात  जाणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिलेचे नाव माहिती आहे का?? माहिती असेल तर अभिनंदन!!!आणि नसेल??? तर नाराज होऊ नका. ही कथा संपता संपता आपल्याला त्या महिलेचे नाव नक्कीच माहिती होईल. शिवाय, तिचा प्रेरणादायी प्रवास ही समजेल. तिच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कथा...

22 सप्टेंबर 1966 रोजी तिचा जन्म इराण मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. इराण मधील क्रांतीमुळे एका सुरक्षित जीवनाच्या शोधात, तिचे कुटुंब अमेरिकेत आले आणि त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व  स्वीकारले.

तिला बालपणापासूनच अवकाशासंबंधी अनेक प्रश्न पडायचे. अवकाश कसे असेल?? त्यात काय काय असेल?? ते दिसतं कसं?? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ती प्रयत्न करायची. एकदा तर तिने एका रॉकेटचे चित्र काढले आणि प्रत्येकाला त्या सांगत सुटली की, “एक दिवस ती रॉकेटमध्ये बसून अवकाशात झेपावेल.” अवकाशात भरारी मारण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती मोठी झाली. पण, अवकाशात भरारी मारण्यासाठी आवश्यक  स्पेस एजन्सीची स्थापना इराणमध्ये 2004 पर्यंत केली गेली नव्हती.

तिच्या या स्वप्नाला बळ मिळाले ते 1984 साली, तिच्या कुटुंबाचे अमेरिकेत स्थलांतर झाल्यावर. इथं तिला शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाल्या. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि कॉम्पुटर सायन्स मध्ये शिक्षण घेतले. हामिद अंसारीशी लग्न केल्यानंतर दोघांनी मिळून दूरसंचार व्यवसायात पाऊल टाकले आणि 1993 मध्ये त्यांनी एका दूरसंचार कंपनीची स्थापना केली.

2006 साली तिला आपले स्वप्नं पूर्ण करण्याची संधी आली. या संधीचं तिनं सोनं करायचं ठरविले. परंतु, यासाठी तिला 2 कोटी डॉलर ( तत्कालीन 113 कोटी रुपये ) ची आवश्यकता होती. ते उभं करणं तिच्या साठी एक मोठं आव्हान होतं. ते ही तिने लिलया पेलले. 8 सप्टेंबर 2006 रोजी, कझाकीस्तानमधील बिकानूर स्पेसक्राफ्ट स्टेशनवरून तिचे यान अवकाशात झेपावले. जवळजवळ 9 दिवस ती आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात होती. असा पराक्रम करणारी ती जगातील पहिलीच मुस्लिम महिला ठरली. ती महिला म्हणजेच अनुशेह अंसारी होय.

अनुशेह अंसारीनी स्वप्न पाहिलं त्यावेळी त्या बालवयात होत्या, शिवाय इराणी स्पेस एजन्सी ची स्थापना 2004 पर्यंत केली गेली नव्हती. परंतु, एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे, ‘स्वप्नं खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे. स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.’ आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनुशेह अंसारी यांनी त्या दिशेने केवळ विचार न करता, कृती केली आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


No comments: