Thursday, December 27, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 96

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 96*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*सुदृढ असूनही आपण दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटांपुढे हतबल होतो. निरोगी शरीराची साथ असल्यामुळे आपण या अडचणींवर मात करून पुन्हा नव्याने उभे राहतो. मात्र, अपंग व्यक्तींच्या बाबतीत काय??? त्यांना होणारा शारीरिक, मानसिक त्रास ,त्यातून येणारे नैराश्य याबद्दल आपल्याकडे काय उत्तर आहे ??? अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या एका तरुणीची ही प्रेरणादायी कथा...

22 ऑक्टोंबर 1990 रोजी तिचा जन्म मिशिगन येथे झाला. ती जन्मतः कर्णबधीर. त्यामुळे बालपणापासूनच अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एकदा तर तिच्या पाठीमागे पंखा कोसळला. तरीही तिला याची खबरच नव्हती. अक्षरशः मरता मरता वाचली. असे एक ना अनेक कठीण प्रसंग तिच्यावर ओढावले. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लहान  मुलांसाठीची एक मोटरसायकल घरच्यांनी दिली होती. तिच्या घरच्यांनी तिला प्रशिक्षित केले. तिला बाईक चालविणे आवडू लागले. पुढे याच आवडीने तिला यशाच्या शिखरावर पोहचविले.

1998 साली तिच्या संपूर्ण कुटुंबाने फ्लोरिडा शहरात स्थलांतर केले. तिला अमेरिकेतील सर्वात मोठ्या अंध ,अपंग आणि कर्णबधीर यांच्यासाठी असलेल्या शाळेत प्रवेश मिळाला. ती या शाळेत 8 वर्षे शिकली. या काळात ती बेलीडान्स, बास्केटबॉल सारख्या बाबींत पारंगत झाली. 

वयाच्या सातव्या वर्षापासून ती विविध मोटारसायकल स्पर्धात सहभागी व्हायची. बऱ्याच स्पर्धात ती यशस्वी झाली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. 2008 सालं, तिच्यासाठी संधी घेवून आलं. WMX अर्थात Women’s Motocross (महिला मोटारसायकल स्वारांसाठीची  स्पर्धा) या स्पर्धेत तिने सर्वोच्च स्थान पटकावले आणि असा पराक्रम करणारी ती अमेरिकेतील पहिली कर्णबधीर महिला ठरली.  वयाच्या केवळ 18 वर्षीच असा पराक्रम करणारी ती तरुणी म्हणजेच एशले फियोलेक होय.

एशले ने 2009, 2011,2012 या वर्षी झालेल्या स्पर्धेत सर्वोच्च स्थान पटकाविले आहे. पण, मित्रांनो हे जेतेपद पटकावताना तिला अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागले आहे. बऱ्याचदा तिच्या जिवावर बेतले आहे. अपघाताची भीती आणि जन्मतः असलेलं बहिरेपण यामुळे तिच्या मनात नकारात्मक विचार जमा व्हायला फारसा वेळ लागला नसता. परंतु, तिने आपल्या आवडीच्या क्षेत्रात लक्ष अधिक घातले. त्यामुळे ती नकारात्मक विचारांपासून दूर राहू शकली. आणखी एक, ती बहिरी असल्याने तिला ‘ You Can’t ’ कधीच ऐकू आले नाही. तिने आपल्या शारीरिक अपंगत्वाला, मानसिक अपंगत्वामध्ये कधीच रूपांतरित होऊ दिले नाही. म्हणूनच ती एक यशवंत आहे.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!




No comments: