Friday, December 28, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 97

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 97*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

*दम्यासारख्या विकाराने त्रस्त असतानाही विश्वविक्रम आपल्या नावावर करणाऱ्या, एका महिला मॅरेथॉन धावपट्टूचा हा प्रेरणादायी प्रवास.*

17 डिसेंबर 1973 रोजी इंग्लंडमधील डेवनहम या छोट्याशा शहरात तिचा जन्म झाला. आई आणि वडील दोघेही उत्तम धावपटू असल्याने तिनेही आई-वडिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला. वयाच्या सातव्या वर्षापासून तिने सरावाला सुरुवात केली. 

1985 साली म्हणजेच वयाच्या 12 व्या वर्षी तिने आपल्या जीवनातील पहिल्यावहिल्या इंग्लिश स्कूल्स क्रॉसकंट्री चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेतील सहभागी 600 स्पर्धकांमध्ये ती 299 व्या स्थानावर होती. हे तिला मिळालेलं पहिलं यश. कारण, तिने तीनशे स्पर्धकांना मागे टाकले होते. एक सकारात्मक विचार अनेक यशांचे द्वार खुले करत असतो. हाच सकारात्मक विचार उराशी बाळगून, वर्षभराच्या मेहनतीनंतर याच स्पर्धेत तिने चौथ्या स्थानावर उडी मारली. हा तिला मिळालेला पहिलावहिला मानाचा क्षण.

दमा आणि ॲनिमियासारख्या आजाराने त्रस्त असूनही, हिंमत न हरता, 1992 साली संपन्न झालेल्या, IAAF वर्ल्ड क्रॉस कंट्री च्या ज्युनियर चैंपियनशिपमध्ये, तिने सर्वांना चकित करणारी कामगिरी करून, प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तीनवेळा लंडन मॅरेथॉन, तीनवेळा न्यूयॉर्क मॅरेथॉन आणि एकदा शिकागो मॅरेथॉन विजेती बनली. 13 एप्रिल 2003 रोजी लंडन मॅरेथॉन दरम्यान, तिने पुरुष व महिला यांच्या एकत्रित मॅरेथॉनमध्ये 2 ता. 15 मि. 25 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम निर्माण केला. जो तब्बल 17 वर्षे अबाधित होता. असा जागतिक विक्रम करणारी ती महिला धावपट्टू म्हणजेच पाऊला जेन रेडक्लिफ होय. 

आपण ठरविलेल्या ध्येयाच्या आड कोणताच अडथळा,आपल्या परवानगीशिवाय येवू शकत नाही. ज्यावेळी एखादी अडचण अथवा समस्या आपल्याला मोठी वाटू लागते,तेंव्हाच ती आपल्या ध्येयाच्या आड येते. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या या ध्येयाच्या मार्गातील किरकोळ समस्या असतात. मोठी समस्या तर आपण आणि आपले नकारात्मक विचारच असतात. पाऊला, दमा,ॲनिमिया सारख्या विकाराने त्रस्त असूनही विश्वविक्रम करू शकल्या. आपण सदृढ आहोत. आपण काहीही करू शकतो.

पाऊला यांनी अनेक मॅरेथॉन, हाफमॅरेथॉन आणि क्रॉस कंट्री मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करून प्रचंड यश संपादन केले आहे.शिवाय देशाचा लौकिक वाढविला आहे. यामुळे इंग्लंड सरकारने पाऊला यांना MBE अर्थात ( A Member of the Order of the British Empire) हा मानाचा खिताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!




No comments: