Friday, December 28, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 98

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 98*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

एका 10 वर्षाच्या मुलीला तिच्या आईने लग्नासाठी विकायचे ठरविले. तिला खरेदी करणाऱ्यांनी तिच्यासाठी हजारो डॉलर द्यायला तयार झाला. तिच्या आईने तिला विक्रीसाठी का काढले असावे ? त्या मुलीने हे होऊ दिले का ? तिच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...

अफगाणिस्तान एक गरीब, पुरुष प्रधान संस्कृती असलेला, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आणि तालिबान सारख्या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाने ग्रासलेला देश. याच देशातील एका मुस्लिम कुटुंबात 1997 साली तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे शिक्षण ही जेमतेम.

ती 10 वर्षाची झाली, तेंव्हा आईने तिला लग्नासाठी विकायचे ठरविले. कारण, तिला आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी विकत घेण्यासाठी पैसे जमा करायचे होते. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. यात बिचाऱ्या आईचाही काहीच दोष नव्हता. कारण, तिच्या आईलाही वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी लग्न करून घ्यावे लागले होते. हा दोष होता परंपरेचा. अफगाणिस्तानात तालिबान्यांचा त्रास वाढल्याने, तिच्या संपूर्ण कुटुंबाने इराण मध्ये स्थलांतर केले. त्यामुळे ती लग्नाच्या संकटातून वाचली. 

इराणी रॅप गायक यास च्या गायकीवर ती फिदा झाली आणि आपणही रॅप गायक होण्याचं स्वप्नं पाहू लागली. नुसतं स्वप्नंच न पाहता, ती प्रत्यक्षात कामालाही लागली. ती गाणी लिहू लागली. वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या आईने पुन्हा तिला लग्नासाठी विकायची भुणभुण सुरू केली. जेणेकरून आपल्या मुलाच्या लग्नासाठी पैसे जमा करता येतील. पण, तिला इतक्या लग्न करायचे नव्हते. 

परंपरेचा आलेला राग आणि आईविषयी, समाजाविषयी, आपल्या लग्नाविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने गीतांचा आधार घेतला यातून “ब्राईड्स फॉर सेल” हे एक सुंदर गीत जन्माला अाले. या गीताचा तिने रॅप केला आणि तो  YOUTUBE वर प्रसारित केला. अल्पावधीतच तिचे गीत लोकप्रिय झाले. तिच्या गीतातून अनेक मुलींच्या बालविवाह विषयीच्या वेदना, दुःख व्यक्त केले. त्यामुळे रोखेर्शहा गेम महानी या डॉक्युमेंटरी निर्मातीने तिच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी ची निर्मिती केली आणि ती प्रसारित केली. या डॉक्युमेंटरी ने संपूर्ण जगाचे लक्ष  वेधून घेतले. त्या डॉक्युमेंटरीचे नाव ‘SONITA’ आणि जिच्या जीवनावर आधारित ही डॉक्युमेंटरी ती म्हणजे सोनिटा अलिजादेह.

आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिने कवितांचा आधार घेतला. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगासमोरही आणला. त्यामुळे तिच्यासोबत, तिच्यासारख्या असंख्य मुलींच्या समस्येविरोधात लढा देण्यासाठी जगातील सहाशेहून अधिक सेवाभावी संस्था  एकत्र आल्या. सोनिटाच्या एका रॅप ने तिला पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान तर मिळवून दिलाच, शिवाय अमेरिकेत शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. 

कोणत्याही समस्येवर तोडगा हा असतोच. त्यासाठी फक्त व्यक्त होणे गरजेचे आहे. हेच सोनिटाने केले.
2015 साली BBC ने जगभरातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत तिला स्थान दिले.  म्हणूनच ती एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



No comments: