Sunday, May 30, 2021

'शिल्पकारांचे शिल्पकार' प्राचार्य श्री.सदाशिव रामचंद्र पाटील म्हणजेच एस.आर.पाटील सर

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *'शिल्पकारांचे शिल्पकार', प्राचार्य श्री.सदाशिव रामचंद्र पाटील म्हणजेच एस.आर.पाटील सर यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

अबोध बालकांमध्ये जोम व चैतन्य जागृत करून, सभ्य नागरिक आणि एक मजबूत समाज निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतो. खऱ्या अर्थाने तो समाजाचा 'शिल्पकार' असतो. हा 'शिल्पकार' असाच घडत नाही. यामागे देखील एक कसलेला 'शिल्पकार' असतो आणि तो अध्यापक विद्यालयात भेटतो. माझ्यासारख्या हजारो शिक्षकांना प्रशिक्षित करून समाजाचा 'शिल्पकार' बनविण्यात सिंहाचा वाटा उचलणारे 'शिल्पकारांचे शिल्पकार' माझे प्राध्यापक, प्राचार्य श्री.सदाशिव रामचंद्र पाटील म्हणजेच एस.आर.पाटील सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्तानेच हा लेखन प्रपंच... 

गोरा वर्ण, खडा आवाज, तीक्ष्ण नजर, शिस्तप्रिय आणि प्रेमळ स्वभाव, सफारी पेहराव असं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे श्री.एस.आर.पाटील सर होय. ते लठ्ठे अध्यापक विद्यालय आष्टा येथील माझे शारीरिक शिक्षण आणि इतिहास अध्यापन पद्धती या विषयाचे प्राध्यापक होते. 

ढवळी ता.वाळवा येथे दि.1 जून 1963 रोजी श्री.रामचंद्र पाटील व बनुताई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडिलांनी दुसऱ्या महायुध्दात काही काळ सेवा बजावली आणि नंतर प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळविली. आई अडाणी,मोठं कुटुंब आणि वडिलांचा तुटपुंजा पगार. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी त्यांनी मोठा संघर्ष करून, M.Ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो पर्यंत वडील सेवानिवृत्त झाले होते. पेठ वडगाव येथे असलेल्या एका विनाअनुदानित अध्यापक विद्यालयात, विनापगार आयुष्यातील पाच वर्षे खर्ची घातली. आज ना उद्या नोकरी मिळेल. या आशेने काम करत राहिले. पण, हाती शून्य आले. अशातच वडिलांचे आकस्मित निधन झाले आणि घरची संपूर्ण जबाबदारी सरांच्या खांद्यावर येऊन पडली. अशा या खडतर परिस्थितीतही त्यांनी नोकरी मिळविण्याचे स्वप्नं पाहणे, त्यासाठी प्रयत्न करणे थांबविले नाही. 

सरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि रयत शिक्षण संस्थेच्या यळगुड शाखेत त्यांना नोकरी मिळाली. पुढे इंगळी(कोल्हापूर),पालशेत(गुहागर), नांद्रे(सांगली),शिरोळ(कोल्हापूर)अशा विविध शाखांत त्यांनी दर्जेदार सेवा बजावली.आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असून, आजही त्यांच्या संपर्कात आहेत. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन संस्थेने त्यांना 2003 साली लठ्ठे अध्यापक विद्यालय,आष्टा' येथे बढती दिली. समाजाचे 'शिल्पकार' घडविण्याची ही नामी संधी त्यांनी साधली. आजवर हजारो शिक्षक त्यांनी घडविले आहेत. जे विविध जिल्ह्यांत कार्यरत असून सरांचा वारसा पुढे चालवत आहेत. 

मी 2005 साली लठ्ठे अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला. विजयसिंह कदम (पिनू) हा माझा गाववाला मित्र. त्यावेळी तो दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो सरांचा अगदी आवडता विद्यार्थी. त्याच्यामुळेच माझीही सरांशी जवळीक निर्माण झाली. सर कमालीचे शिस्तप्रिय. परिपाठापासून ते शारीरिक शिक्षणाच्या अंतिम तासापर्यंत प्रत्येक छात्राध्यापकावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. मी पेपर टाकण्याचे काम करायचो. त्यामुळे शनिवारी किंवा सकाळच्या शाळेच्या वेळी हमखास उशीर व्हायचा. त्यावेळी उशिरा येणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी त्यांच्याकडून दंड आकारण्यात यायचा. मी एक-दोन वेळा दंड दिला. पण, सारखा-सारखा दंड देणे शक्य नसल्याने, शेवटी उशिरा येण्याचे कारण त्यांना सांगितले. तेंव्हा त्यांनी खात्री करून, मला मगच सूट दिली.

डी.एड. मधील आणखी एक प्रसंग मला आजही आठवतो. 2005 साली डी.एड.ला नवीन अभ्यासक्रम आला. यात 'आंतरवासिता' या नव्या संकल्पनेचा समावेश झाला. द्वितीय वर्षाच्या परीक्षेनंतर सहा महिन्यांची आंतरवासिता प्रत्येक छात्राध्यापकाने करणे अनिवार्य होते. यासाठी विद्यालयाने प्रत्येक छात्राध्यापकाला एका शाळेवर नियुक्ती दिली. मला दूरच्या शाळेत नियुक्ती दिल्याचे,सरांना समजले. ते ठिकाण माझ्या घरापासून दूर तर होतेच शिवाय, खर्चिकही होते. माझ्या कौटुंबिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव त्यांना होती. त्यावेळी माझ्या परस्पर आंतरवासिता विभाग प्रमुखांना मला सोयीची शाळा देण्याची त्यांनी विनंती केली. त्यामुळे मला घरापासून अगदी जवळ असणाऱ्या 'थोरात वसाहत' या शाळेवर नियुक्ती मिळाली. मला हा किस्सा वर्गमित्र निलेश कांबळेनी सांगितला. माझ्याबद्दल सरांना आस्था आहे. हे मला पुन्हा एकदा जाणवलं. त्यामुळे सरांविषयीचा आदर आणखीनच वाढला. 

माझ्या प्रत्येक सुख-दुखाच्या क्षणाचे सर साक्षीदार. माझ्या घरी त्यांचे नियमित येणे-जाणे व्हायचे. माझ्या कौटुंबिक परिस्थितीची पुरेशी कल्पना असल्याने, त्यांनी वारंवार मला मार्गदर्शन केले. सातत्याने प्रेरणा दिली. विश्वास दिला. त्यामुळे मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो आणि नोकरीलाही लागलो. त्यामुळेच माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांनी टाकलेला शब्द खाली पडू न देण्याची दक्षता मी आजवर घेतली आहे. 

2018 साली सरांना 'लठ्ठे अध्यापक विद्यालय,आष्टा' येथेच प्राचार्यपदी बढती मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत 'लठ्ठे अध्यापक विद्यालया'ची घोडदौड कायम राहिली. अनेक माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करून विद्यालय भौतिक सुविधांनी समृध्द करण्यात ते यशस्वी ठरले. सरांना चंद्रपूर जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

माझ्यासारख्या हजारो शिक्षकांच्या जडणघडणीत सरांचा मोठा वाटा असणारे श्री.एस.आर.पाटील सर हे माझे दैवत आहेत. ते 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! 

श्री.एस.आर.पाटील सर यांचा संपर्क क्रमांक -  9823551676

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

*धन्यवाद...*



No comments: