Monday, May 31, 2021

श्री.जगदीश सखाराम नलवडे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *श्री.जगदीश सखाराम नलवडे सर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

दुधगाव ता. मिरज. सर्वाधिक शिक्षक असलेलं गाव म्हणून सांगली जिल्ह्यातील लौकिक प्राप्त गाव. हजारो शिक्षक या भूमीत जन्माला आले. काही याच गावातील शाळेत नोकरीस लागले. पण, मोजक्याच शिक्षकांना या गावातील शाळेत मुख्याध्यापक पद प्राप्त झाले. श्री.जगदीश सखाराम नलवडे गुरुजी त्यांपैकीच एक. दिनांक 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्तानेच हा लेखन प्रपंच... 

दुधगाव, ता. मिरज येथील सर्वसामान्य शिक्षणप्रेमी, शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांचे शिक्षण सातवी पर्यंत झाल्याने, त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. आपल्या तीन मुलींना त्यांनी शिक्षिका बनविलं होतंच. शिवाय, "मुलानेही ही शिक्षक व्हावे." अशी त्यांची इच्छा. बँकिंग क्षेत्रात भवितव्य घडवण्याची मनिषा बाळगणाऱ्या नलवडे सरांनी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर डी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. वडिलांची तीव्र इच्छा आणि सरांचे बुध्दी कौशल्य फळाला आले. 1981 साली त्यांना सांगलीतील एका खाजगी शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. वर्षभरातच वडिलांचा अचानकपणे मृत्यू झाला आणि घरची संपूर्ण जबाबदारी सरांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी संस्थेतील नोकरीला रामराम ठोकला. 

अल्पावधीतच घरची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. घरची व्यवस्था लावली. याच काळात सांगली जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. शिक्षकाची नोकरी पुन्हा खुणावू लागली. त्यांना ती प्राप्तही झाली. 5 जुलै 1984 साली सिध्दनाथ ता.जत येथून त्यांच्या जिल्हा परिषदेकडील नोकरीचा शुभारंभ झाला. त्यानंतर बिरानाळ (ता.जत), नावरसवाडी, सावळवाडी (ता.मिरज) या शाळांत सेवा बजावली. ज्या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवले, त्याच दुधगाव नं. 1 शाळेत, 28 ऑगस्ट 2011 रोजी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. तब्बल 10 वर्षे दुधगाव नं.1 शाळेत मुख्याध्यापक पदाचे शिवधनुष्य त्यांनी लिलया पेलले. 

माझे सातवी पर्यंतचे शिक्षण दुधगाव नं.1 शाळेतच झाले. मला डी.एड.ला प्रवेश मिळाल्यानंतर माझी पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळली. 2009 पासून मी या शाळेचे किर्द लेखन करायला सुरुवात केली. त्यामुळे शाळेत वारंवार जाणे व्हायचेच. सरांनीही त्यांच्या सुरुवातीच्या काळात किर्द लेखनासाठी माझी मदत घेतली. त्यामुळेच सरांना अगदी जवळून पाहण्याचा योग तर आलाच, शिवाय स्नेहही जुळला.

नलवडेसर म्हणजे रोखठोक स्वभाव, उत्तम संघटक, सहकाऱ्यांना प्रेरणा अन् कामात स्वातंत्र्य देणारं, शाळा आणि विद्यार्थी विकासाच्या ध्येयासाठी प्रसंगी पदरमोड करणारं, प्रामाणिक आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व. सरांच्या नेतृत्वाखाली शाळेने यशाची शिखरे पदाक्रांत केली आहेत. विविध प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळा सुसज्ज करण्यात सरांचे मोठे योगदान आहे.

प्रोजेक्टर असणारी, 15 संगणकाचे भव्य संगणक कक्ष उभारणारी मिरज पश्चिम भागात सर्वात पहिली शाळा म्हणून सरांच्या नेतृत्वाखाली शाळेला हा लौकिक प्राप्त झाला. जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत शाळेने अव्वल स्थान मिळविले. शिवाय शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून, त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यातही सरांची भूमिका महत्वाची. वयानुरूप दाखल झालेल्या विद्यार्थ्यासाठी केलेल्या कामाची दखल पुणे विभागीय आयुक्तांनी घेतली आहे. एकंदरीत शाळेच्या विकासात त्यांनी मोलाची भूमिका पार पडली. 

शैक्षणिक कामकाजाचा बरोबरच त्यांनी संघटनात्मक पातळीवरही उत्तम प्रकारचे काम केले. शिक्षक संघाचा कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला प्रवास जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत पोहचला. शिवाय, त्यांनी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पदही भूषविले. 

2018 साली दुधगाव नं.1 शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या इतिहासातील हा सर्वात सुंदर, आकर्षक आणि अविस्मरणीय असा कार्यक्रम ठरला. हा कार्यक्रम त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू असणारा एक क्षण. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील राजकीय लोकांना हाताळण्याची त्यांची हातोटी दिसून आली. गावातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणून कार्यक्रम यशस्वी केला. 

नलवडे सरांच्या आजवरच्या कारकिर्दीची दखल घेऊन पंचायत समिती मिरज, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आणि ग्रामपंचायत दुधगाव यांचेकडून 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे. 

श्री. जगदीश नलवडे सरांनी तन-मन-धन अर्पून शाळेला प्रगतीपथावर आणण्याचे काम अत्यंत चोखपणे बजावले आहे. दिनांक 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! 

श्री. जगदीश नलवडे सर यांचा संपर्क क्रमांक - 9850275434

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*

*धन्यवाद...*







No comments: