Sunday, June 6, 2021

श्री.सुनिल चव्हाण सर - एक समृध्द, उन्नत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *श्री.सुनिल चव्हाण सर - एक समृध्द, उन्नत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व *

🎯 *श्री.संदीप पाटील, दुधगांव. 9096320023.*


वाचन हा व्यक्तीला समृद्ध करणारा छंद. पुस्तके वाचल्याने जो आनंद मिळतो, जो अन्य कोणत्याही कार्यातून मिळत नाही. वाचनाने ज्ञान वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर, एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण, भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर, पुस्तक कसे जगायचं ? ते शिकवेल." पुस्तकांमध्ये ज्ञानाचे अंकुर असतात आणि ते चांगला नैतिक सल्ला देतात. चांगली पुस्तके सद्गुणांवर प्रेम करायला शिकवतात आणि चांगली पुस्तके वाचल्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित होतेच. शिवाय चरित्रही उन्नत होते. असेच एक समृध्द, उन्नत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.सुनील चव्हाण सर होय. 

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या चव्हाण सरांचा जन्म, नेवरी ता. कडेगांव येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. स्व.पतंगराव कदम साहेब यांच्यावर त्यांचं जिवापाड प्रेम. याच प्रेमापोटी त्यांनी बारावीनंतर साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करायला सुरुवात केली. फावल्या वेळेत वाचनाचा व्यासंग जपला. 'मिळेल तसं आणि मिळेल तिथं' त्यांनी पुस्तकं वाचली. त्यामुळं मस्तक सुधारलं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली. ही झळाळी स्व.पतंगराव कदम साहेबांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी चव्हाण सरांच्या जबाबदारीत वाढ केली. त्यांच्यावर ओ.एस.डी. म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनीही ती अगदी लिलया पेलली. तब्बल 26 वर्षे अगदी प्रामाणिकपणे त्यांनी आपलं काम केलं. अगदी साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांच्या सोबत राहिले. 

दुधगावचे सुपुत्र श्री.अजित साजणे सर आणि श्री. सुनिल चव्हाण सर यांची घनिष्ट मैत्री. साजणे सरांच्या दुधगाव येथील घरी त्यांचं 28 मे 2021 रोजी येणं झालं. साजणे सरांना श्री.चव्हाण सरांचे 'वाचनवेड' ठाऊक होते. मिळालेला प्रत्येक वेळ ते वाचनासाठी देतात. अगदी प्रवासात असतानाही ते पुस्तक वाचत असतात. हे त्यांचं वाचनवेड आम्हाला प्रत्यक्ष अनुभवास मिळालं. चव्हाण सरांनी 'कर्मवीर सार्वजनिक वाचनालयास' भेट द्यावी.' असा आग्रह साजणे सरांनी धरला. तेंव्हा 'वाचन' हा 'जीव की प्राण' असणाऱ्या चव्हाण सरांनी अगदी आनंदाने भेट दिली. जितका वेळ त्यांनी साजणे सरांना दिला नाही, त्यापेक्षा अधिक वेळ त्यांनी वाचनालयास दिला. येथील सर्व पुस्तके त्यांनी आपल्या नजरेखाली घातली. शिवाय, त्यांना हवी असलेली अति महत्वाची दोन जुनी पुस्तके वाचनालयात उपलब्ध झाली. परत करण्याच्या बोलीवर ती वाचण्यासाठी घेतली. वाचनालयाची आजवरची वाटचाल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय गाडीत उपलब्ध असलेली काही पुस्तकेही त्यांनी भेटही दिली. शिवाय आणखी काही पुस्तके भेट देण्याबाबत शब्दही दिला. 

श्री. चव्हाण सरांनी शुक्रवार दि. 4 जून रोजी रात्री 9 वाजता अचानक वाचनालयास भेट दिली. वाचनालयातून घेतलेली दोन पुस्तके त्यांनी परत केली. शिवाय, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी तब्बल शंभर पुस्तके वाचनालयास भेट देऊन, सर्वांनाच अचंबित केले. त्यांच्या या दातृत्वाने 'कर्मवीर सार्वजनिक वाचनालय' समृध्द होण्यात खुप मोठा हातभार लागला आहे. 

श्री.चव्हाण सरांशी झालेली ही दुसरी भेट. त्यांच्या बोलण्यातून, त्यांचा गाढा अभ्यास दिसून आला. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांचा व्यासंग आणि पुस्तकांप्रती आत्मियता प्रतित होत होती. त्यांच्या आजवरच्या यशाचा पाया हा पुस्तकांनीच रचला आहे. हे ही जाणवलं. वाचन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी काही कल्पनाही सुचविल्या.  "पैसा आणि पुस्तक लॉकरमध्ये ठेऊन काही उपयोग होणार नाही." जाता-जाता त्यांनी काढलेल्या या उद्गारांनी आमची विचारचक्र अधिक गतिमान केली. सरांची ही दुसरी भेट आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार मित्र श्री. संतोष कणसे सर हेही उपस्थित होते.

श्री. चव्हाण सरांनी वाचनालय अधिकाधिक समृद्ध होण्यास हातभार लागला आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार ! 

*वाचनालयाची आजवरची वाटचाल ही लोकसहभागातून झाली आहे.आपणही पुस्तक अथवा आर्थिक स्वरूपात मदत देऊन ग्रंथालय समृद्ध करण्यात हातभार लावू शकता.9405266221 / 9960610227*


*धन्यवाद !!!*