Friday, June 18, 2021

एक विलक्षण समाधानी दिवस....

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *एक विलक्षण समाधानी दिवस....*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

गुरुवार दिनांक 17 जून 2021 रोजी खरेदीच्या निमित्ताने सांगलीतील डी-मार्ट ला जाणं झालं. गाडी 'पार्क' केली. पावसाची रिपरिप सुरूच होती. मी आणि राजश्री एकाच छत्रीमधून प्रवेशद्वारा जवळ आलो. इतक्यात चिखलात एक 'वॉलेट' पडलेलं दिसलं. एक क्षण दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्याच क्षणाला ते उचलूनही घेतलं. गडबडीनं पाहिलं. सहा-सात 'ATM कार्ड,आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एका मेडिकलचे कार्ड आणि तब्बल 5000 ₹' रोख रक्कम त्यात होती. 'सुशील लोंढे' नावाच्या व्यक्तीचं हे 'वॉलेट' आहे. हे आधारकार्ड वरून समजलं. बाजूलाच असलेल्या एका स्टॉल धारकाकडे चौकशी केली. त्याचं नाव विचारलं. ते 'वॉलेट' त्या स्टॉल धारकाचं नसल्याचं जाणवलं. 


''सुशील लोंढे ही व्यक्ती डी-मार्ट मध्ये खरेदीलाच आलेली असणार. गडबडीत ते पडलं असावं. त्यामुळे आत जाऊनच 'वॉलेट' च्या मालकाचा शोध घेऊ.'' असं मनोमन ठरवून 'बेसमेंट' मध्ये शिरलो. कोरोनामुळे 'बेसमेंट' मध्ये रांगेत उभं रहावं लागतं. नंबर आला, कि मुख्य इमारतीत प्रवेश मिळतो. गर्दी असल्याने रांगेत उभं राहूनच 'वॉलेट' चाळलं. फोन नंबर मिळतोय का ? ते शोधलं. आधार कार्डवरील पत्ता विश्रामबाग येथील होता. पण, ड्रायव्हिंग लायसन्स वरील पत्ता मात्र 'हिंगणगाव,ता.कवठे महांकाळ' येथीलच होता. 


'हिंगणगाव' हे नाव वाचून मला खूपच आनंद झाला. श्री.विनोदकुमार पाटील सर हे शिक्षकमित्र त्याच गावचे. 'यशवंत-एक प्रेरणास्त्रोत' चे ते नियमित वाचक. अगदी दुसऱ्या पर्वापासून ते सतत संपर्कात आहेत. त्यामुळे सुशील लोंढेंचा फोननंबर त्यांच्याकडे नक्की मिळेल. अशी खात्री वाटली.


'बेसमेंट' मधूनच पाटील सरांना कॉल केला. घटनेची माहिती दिली. सुशील लोंढे ही व्यक्ती सरांच्या परिचयाची होती. पण, त्यांच्याकडे फोननंबर नव्हता. फक्त पाचच मिनिटांत फोननंबर उपलब्ध करून देण्याची तत्परता त्यांनी दर्शविली. सुशील लोंढे हे सांगलीतील एका मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करतात. हे सरांनी फोन ठेवता-ठेवता सांगितले. 


"तो सांगलीतील एका मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करतो." या सरांच्या माहितीने, नजरे समोर संदिप कोलेचा आला. संदिप माझा वर्गमित्र. तो सांगलीतील एका प्रसिद्ध अशा होलसेल मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करतो. जिल्हाभरातील मेडिकल्सना औषधं पोहोच करण्याचं काम, एक तपाहून अधिक काळ तो करतो आहे. त्याच्याकडे लोंढेंबद्दल माहिती मिळते काय ? हे पाहण्यासाठी सहज त्याला कॉल केला. सुदैवाने संदिप कोलेचा आणि सुशील लोंढेंचा उत्तम परिचय होता. संदिपकडून लोंढेंचा नंबर घेतला.


लोंढेंचा नंबर 'ट्राय' केला. काही केल्या फोनच लागेना. म्हणून, त्यांना टेक्स्ट मेसेज केला अनेक पुन्हा एकदा संदिप कोलेला 'कॉल' केला. त्याने एक-दोन पर्याय सुचविले. तोपर्यंत 'बेसमेंट' मधून बाहेर पडून, डी-मार्टच्या मुख्य इमारतीकडे निघालो. तेवढयात माझ्या फोनची 'रिंग' वाजली. नंबर अनोळखी होता. फोन उचलला. तिकडून सुशील लोंढें बोलत होते. योगायोगाने ते डी-मार्ट होते आणि माझ्याच समोर उभे होते. खात्री केली आणि त्याचं 'वॉलेट' त्यांना सुपूर्त केलं. त्यांनी मनोमन आभार मानले आणि ते खरेदीसाठी निघून गेले. 


संदिपला फोन करून सांगितलं. त्याचे आभार मानले. मग, हिंगणगावचे सुपुत्र श्री.विनोदकुमार पाटील सरांना कॉल केला. 'वॉलेट' मालकाकडे पोहोचल्याचे कळविलं. समस्त हिंगणगावच्या वतीने त्यांनीही माझे आभार मानले. 


बोलता-बोलता सुशील लोंढे यांच्या बद्दल अधिक माहिती मिळाली. ते सध्या सांगलीत वास्तव्यास आहेत, परंतु गावातील सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी असतात. काही दिवसापूर्वी श्री.विनोदकुमार पाटील सरांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या, "कर्तव्यनिधी" या उपक्रमासाठी सुशील लोंढे यांनी दोन ऑक्सीमीटर भेट दिले आहेत.तसेच अन्य सेवाभावी उपक्रमांमध्ये देखील ते सहभागी असतात. 

लोंढे यांचं वॉलेट त्यांच्या हातात पोहोचवण्यासाठी श्री विनोद कुमार पाटील सर आणि वर्गमित्र संदीप कोले यांचा मोलाचा वाटा होता. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. !!

एका परोपकारीवृत्तीच्या व्यक्तीची मदत केल्याचे एक विलक्षण समाधान दिवसभर लाभले. ही घटना आई-वडिलांना रात्री सांगितली. त्यांनाही आनंद झाला. 


धन्यवाद...!





1 comment:

Unknown said...

Khup Chan Sir, aashi kame karayala aani aahsya preranadayi gosti vachun man prasann hote. Thanks 🙏🙏