🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 99*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
अशक्य ते शक्य करून दाखविणाऱ्या एका ध्येयवादी तरुणीच्या संघर्षाची विलक्षण अशी कथा...
2 फेब्रुवारी 1983 रोजी अमेरिकेतील ऍरिझोना प्रांतातील सिएरा व्हिस्टा येथे, एका सधन कुटुंबात तिचा जन्म झाला. आईवडिलांची वैचारिक बैठक अतिशय व्यापक असल्याने, त्यांनी अगदी बाल वयातच, तिच्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी केली. त्यामुळे " अशक्य " हा शब्द तिच्या डिक्शनरीतून गायबच झाला.
वडील संगीतकार असल्याने घराचे वातावरण एकदम संगीतमय असेच. त्यामुळे ती नृत्याबरोबरच, पियानो वाजविण्यात तरबेज झाली. पुढे जाऊन आपल्या कौशल्याच्या बळावर साऱ्या जगाचे लक्ष स्वतः कडे आकर्षित केले.
वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या वडिलांच्या इच्छेखातर, तायक्वांदो शिकून, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने आपला पहिला जागतिक ब्लॅक बेल्ट मिळविला. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात तिने हिरीरीने भाग घेतला.
2005 साली ती मानसशास्त्र या विषयातून पदवीधर झाली. आयुष्यातील खडतर प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद, मानसशास्त्रामुळे मिळाली. अशी तिची धारणा होती.
ती कार चालवायला शिकली. तुम्ही म्हणाल, ‘यात काय विशेष आहे ?’ पण, विशेष अजून पुढे आहे. कार चालवताना, तिला आकाश खुणावू लागले. तिच्या मनात विमान चालविण्याची, पायलट बनण्याची इच्छा निर्माण झाली. ते तिचे स्वप्नं बनले.
ती हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागली. तिच्या पायलट बनण्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. परंतु, केवळ 6 महिन्यांच्या प्रशिक्षणाला तिला 3 वर्षे लागली. तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर 2008 साली पायलट बनल्याचे प्रमाणपत्र मिळाले. तिला 10 हजार फूट उंचीपर्यंत विमान उडविण्याची परवानगी मिळाली. जेंव्हा तिने पहिल्यांदा सिंगल इंजिन असलेले विमान चालविले. तेंव्हा तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ने घेतली. कारण, असा पराक्रम करणारी आणि दोन्ही हात नसलेली, ती जगातील पहिलीच पायलट महिला बनली होती. ती महिला म्हणजेच जेसिका कॉक्स.
दोन्ही हात नसलेल्या जेसिका, उत्तम नृत्य करतात. पियानो वाजवितात. तायक्वांदोत जागतिक ब्लॅक बेल्ट मिळविणारी त्या जगातील एकमेव आहेत. त्या कार चालवितात. त्यांना विमान चालविण्याचा शंभरेक तासांचा अनुभव आहे. त्या की – बोर्ड वर एका मिनिटात 25 शब्द टायपिंग करते. ज्या गोष्टी आपण दोन्ही हात असताना करतो. त्या सर्व गोष्टी,किंबहुना त्या पेक्षाही अधिक गोष्टी जेसिका लिलया करतात. शरीराने आणि सर्वार्थाने धडधाकट असलेले अनेकजण जेंव्हा रडत असतात. तेंव्हा त्यांच्यासाठी जेसिका यांची ही विलक्षण कथा अतिशय प्रेरणादायी ठरेल.
जेसिका यांच्या आजवरच्या प्रवासातील यशाचे गमक कशात आहे ? तर ते त्यांच्या प्रचंड जिद्दी स्वभावात आहे. कारण, जिद्दीने पेटलेल्या लोकांना कसल्याच सीमारेषा नसतात. जोपर्यंत ईप्सित साध्य होत नाही. तोपर्यंत ही लोकं थांबत नाहीत.
जेसिका यांच्या या जिद्दी स्वभावामुळे, अनेक विक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यामुळेच, त्या अमेरिकेतील 100 प्रभावी लोकांच्या यादीत विराजमान आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!
No comments:
Post a Comment