Monday, December 31, 2018

यशवंत एक प्रेरणास्रोत भाग 100

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 100*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


अवकाशाला गवसणी घालणाऱ्या, अफाट, अदभूत 
स्त्री ची आणि तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीची ही प्रेरणादायी कहाणी...

19 सप्टेंबर 1965 रोजी तिचा जन्म ओहिओ प्रांतातील युकिल्ड शहरात झाला. तिचे वडील एक न्युरोसर्जन होते. 1983 मध्ये तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर युनायटेड स्टेट्स नेवल अकॅडमीत प्रवेश घेतला. 1987 साली ती बॅचलर ऑफ सायन्स झाली आणि त्याच वर्षी तिची निवड अमेरिकन नेव्हीत झाली. 1995 साली नेवल टेस्ट पायलटच्या प्रशिक्षक आणि सुरक्षा अधिकारीपदी बढती मिळाली.1998 हे वर्ष तिच्यासाठी मोठी संधी घेऊन आले. नासाच्या अवकाश मोहिमेकरिता तिची निवड झाली. 

तिची निवड म्हणजे तिने आजवर केलेल्या मेहनतीचे फळ.

तिची निवड म्हणजे तिच्या अफाट अन् अदभूत क्षमतेवर नासा चा असलेला प्रचंड विश्वास. 

तिची निवड म्हणजे काहीतरी वेगळं करून दाखविण्याची तिला मिळालेली पहिली आणि शेवटची संधी.

आलेल्या संधीचं तिने सोनं केलं. होकार कळवला. तयारीला लागली. प्रशिक्षण सुरू झालं. पण...

फेब्रवारी 2003 मधील एका घटनेने साऱ्या जगाला हदरून सोडले. कोलंबिया यानाच्या झालेल्या अपघातात नासाचे 7 अंतराळवीर मृत्युमुखी पडले. कल्पना चावला त्यापैकीच एक. ही घटना तिच्यासह समस्त अंतराळवीरांसाठी धक्कादायक होती. 

ही घटना ताजी असतानाच 9 डिसेंबर 2006 रोजी ती STS—116 या अवकाशयानातून अवकाशात रवाना झाली. आपल्या या पहिल्या मोठ्या मोहिमेत ती तब्बल 192 दिवस अंतराळात वास्तव्यास होती. आज पर्यंत ती तब्बल 321 दिवस 17 तास आणि 15 मिनिटे इतका वेळ अंतराळात वास्तव्यास होती. एका महिलेने इतके दिवस अंतराळात मुक्काम करणे. हा एक विश्वविक्रम आहे. असा विश्वविक्रम ती महिला म्हणजेच सुनीता विल्यम्स होय.

प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक विचार करण्याची, 
कठोर मेहनत करण्याची, 
धाडसी निर्णय घेण्याची,
घेतलेला निर्णय यशस्वी करण्याची, 
जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता
आणि
जोखीम पत्करण्याची तयारी,
यामुळे सुनीता अवकाशात सर्वाधिक काळ वास्तव्य करू शकल्या. त्यांनी दाखविलेले धाडस, केलेले काम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या या पराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब दिला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!

No comments: