Saturday, May 30, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 163

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 163
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने स्वतःच्या कर्तृत्वावर मायक्रोसोफ्टसारख्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळवली. काही वर्षाच्या नंतर त्याने ती नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज त्याचा व्यवसाय देशभरात यशस्वी व्यवसाय म्हणून ओळखला जातो.हा व्यवसाय उभा करताना त्याला मोठा संघर्ष करावा लागला. त्या व्यक्ती बद्दल आणि त्याच्या संघर्षा बद्दल जाणून घेऊन आजच्या भागात. चला तर मग..

25 ऑगस्ट 1985 रोजी पंजाब मधील लुधियाना या शहरात एका सामान्य परिवारात भाविश चा जन्म झाला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या भाविश ने मुंबई आयआयटी मधून कॉम्पुटर सायन्स मधून बी.टेक. ची पदवी संपादन केली आणि मायक्रोसोफ्टसारख्या नावाजलेल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी मिळवली. नोकरी करत असतानाच तो स्वतः अनेक संशोधने करायचा. परिसरातील समस्यांवर उपाय योजना तयार करायचा. काही संशोधनाचे पेटंट देखील त्याने मिळविले होते. चांगली नोकरी अन् पगार चांगला असून देखील तो 9 ते 5 च्या नोकरीत असमाधानी होता. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्याला नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मालक म्हणून काम करण्याची इच्छा होती. परंतु, या सुरक्षित नोकरीने त्याला बांधून ठेवले होते.

एक दिवस तो प्रवासाला निघाला होता. यासाठी त्याने एक चारचाकी वाहन ठरवून ठेवले होते. या प्रवास त्याला जन्मभर लक्षात राहिल असा अनुभव आला. निम्मा अर्धा प्रवास झाला नाही तोवर गाडीचालकाने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्याचे वर्तन, त्याची बोलण्याची पद्धत अत्यंत वाईट होती. त्या चालकाच्या दूर्व्यवहारणे भाविश हैराण झाला आणि तो अर्ध्या वाटेतच गाडीतून खाली उतरला आणि पुढील प्रवास त्याने बस ने पूर्ण केला. "जे आपल्या वाट्याला आले ते अनेकांच्या वाट्याला येत असेल. ते सर्व उत्तम सुविधेच्या शोधात असतीलच. त्या सर्वांना उत्तम सुविधा आपल्याला मिळवून देता येईल का ?" असे विचार बस प्रवासा दरम्यान त्याच्या मनात घोंगावत होते. या प्रसंगामुळे त्याच्या मनात असलेला व्यवसायाचा विचार अधिकच पक्का झाला. त्याने स्वतःच एक ट्रॅव्हल एजंट बनण्याचा निर्णय पक्का केला. हा विचार त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना बोलून दाखवला. परंतु त्याच्या या विचाराची थट्टा मस्करी केली गेली. घरच्यांनी तर त्याला सपसेल वेडाच ठरविले. कारण, इतकं शिक्षण आणि नोकरी सोडून जर कोणी एजंट बनत असेल तर त्याला कोणीच शहाणा म्हणणार नाही.

स्वतःचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो वेडाच झाला. याच वेडेपणात त्याने नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. आपल्या बुद्धीच्या,जिद्दीच्या,मेहनतीच्या, स्वतः वरच्या विश्वासाच्या जोरावर त्याने ती कंपनी यशस्वी करून दाखविली. केवळ तीनच वर्षात ती कंपनी 100 कोटींची झाली आणि तो करोडपती बनला. ती कंपनी म्हणजेच ओला कॅब (OLA) आणि त्याचा सह संस्थापक म्हणजेच भाविश अग्रवाल होय. 

एका मुलाखतीत भाविश अग्रवाल म्हणतात, " स्वप्नं तर प्रत्येक व्यक्ती पाहतो. पण, काहीच लोकं जोखीम उचलण्यासाठी तयार असतात. जेंव्हा तुम्ही जोखीम उचलता, तेंव्हा तुम्हाला सल्ला देण्यासाठी अनेक सल्लागार भेटतील. पण,लक्षात ठेवा. यशस्वी तोच होतो, जो ऐकतो सर्वांचं पण, करतो मनाचं."

भाविश अग्रवाल आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जोखीम उचलण्यासाठी नोकरी सोडण्यास तयार झाले. अनेकांनी त्यांच्या या विचारांची थट्टा मस्करी केली, त्यांना वेड्यात काढलं. पण, त्यांनी ऐकलं जनाचं पण, केलं मनाचं. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहोचले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 162* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/162.html

No comments: