Sunday, May 31, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 164

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 164
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

भारतीय शेअर बाजारात दाखल होणारी पहिली इंटरनेट कंपनी कोणती ? हे आपणास माहीत आहे का ? असेल ? तर अभिनंदन !!! आणि नसेल ? तर काळजी करू नका. हा लेख संपता-संपता आपणास त्या कंपनीविषयी नक्कीच माहिती होईल. त्या कंपनीच्या संस्थापकाचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.. चला तर मग....


1963 साली भारताच्या राजधानीत दिल्लीत त्यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर तर आई गृहिणी. एका सुशिक्षित घराण्यात त्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले. अभ्यासात हुशार असल्याने, तो एक उत्तम नोकरी मिळवेल. अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं.

इकडे आई-वडील त्याला एक डॉक्टर किंवा इंजिनिअर बनविण्याचं स्वप्नं पाहत होते. तर तिकडे त्याने अगदी लहान वयातच एक मोठा व्यावसायिक बनण्याचं मोठं स्वप्नं पाहिलं होतं. कोणता व्यवसाय करायचा ? कुठं करायचा ? कधी करायचा ? यासारख्या अनेक प्रश्नाबाबत तो अनभिज्ञच होता.
शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर तो नोकरी करण्यासाठी बाहेर पडला. तीन वर्षे नोकरी केली. पण, व्यवसाय करायचा आत्मविश्वास त्याच्यात अजूनही आला नव्हता. पण, तरीही नोकरी सोडली. MBA केलं आणि परत नोकरीच केली. लग्न केलं आणि वर्षभरातच नोकरी सोडली. बायको कमावती होती. त्यामुळे घरखर्चाची चिंताच नव्हती.

आपल्या मित्रांच्या सोबतीने दोन कंपन्यांची स्थापना केली आणि काम सुरु केले. परंतु, काही दिवसातच त्यांनी एक कंपनी वाटून घेतली. कंपनी म्हणजे नावालाच. त्या कंपनीत त्यांना कसलाही फायदा झाला नाही. या पडत्या काळात त्याने काही संस्थात  अध्यापनाचे काम केले.तर काही काळ कन्सल्टींग ऑडिटर म्हणून देखील काम केले. स्वतःला एक व्यावसायिक म्हणून उभारण्यासाठी त्याने अनेक कष्ट केलेले होते. परंतु, अजूनही पदरात पडले यशाचे दान पडले नव्हते. म्हणतात ना "कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती." प्रयत्न करणार्‍याला कधीतरी यश मिळतंच. नेमकं त्याच्या बाबतीत असंच घडलं..

1996 सालं उजाडलं होतं. भारतात इंटरनेट जोर धरू लागलं होतं. अशातच दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तो गेला. त्याठिकाणी त्याने एका स्टॉल ला भेट दिली. WWW या तीन अक्षरांनी त्याची उत्सुकता वाढविली. ते काय आहे ? हे त्याने जाणून घेतलं. त्याला येणाऱ्या दिवसांचे भविष्य समजले. आपणही एक इंटरनेट कंपनी स्थापन करण्याचा त्याने निर्णय घेतला. नुसता निर्णयच नाही, तर अथक परिश्रम करून त्याने प्रत्यक्ष इंटरनेट कंपनी देखील स्थापन केली. आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर त्यांने त्या कंपनीचा लौकिक भारतभर पसरविला. ती भारतातील नावाजलेली कंपनी म्हणजेच 'नोकरी डॉट कॉम' होय आणि त्याचा संस्थापक म्हणजेच संजीव बिखचंदानी होय. 

प्रत्येक मोठ्या कंपनीचे सुरुवात अगदी लहानातून होते. तशीच सुरुवात नोकरी डॉट कॉम चीही झाली. त्याकाळी आजच्या सारखे तंत्रज्ञान पुढारलेले नव्हते. त्यामुळे काहीच लोकं यात प्राविण्य मिळविलेली होती. त्यांना कंपनीचे शेयर देवून वेबसाईट तयार केली. प्रत्यक्ष कंपनी उभारताना संजीव यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तरीही संजीव अगदी

धैर्याने त्याला सामोरे गेले. आणि यशस्वी झाले. अगदी लहान वयात पाहिलेले संजीव यांचे स्वप्नं प्रत्यक्षात आले. त्यासाठी त्यांना संघर्ष किती करावा लागला ? हे आपण जाणलेच असेल. 

जीवनसाथी डॉट कॉम, 99एकर डॉट कॉम आणि शिक्षा डॉट कॉम या कंपन्या देखील संजीव चालवितात. संजीव यांच्या अथक परिश्रमातून नोकरी डॉट कॉम ही भारतातील पहिली इंटरनेट कंपनी ठरली आहे. शिवाय शेअर बाजारात दाखल होणारी ती पहिलीच कंपनी आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..





🎯 *भाग - 163* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/163.html

No comments: