Tuesday, June 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 166

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 166
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

चीनकडून सातत्याने होणारी घुसखोरी,त्यामुळे सीमेवर निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण, याचबरोबर भारताच्या सार्वभौमत्वाला छेद देण्याचा चीनकडून होणारा प्रयत्न या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी, काही दिवसापूर्वी सोनम वांगचुक यांनी देशाला एक व्हिडीओ संदेश दिला. यामध्ये त्यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याबाबत जनतेला आवाहन केले आणि बघता - बघता एक जनआंदोलन उभे राहिले. बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये असलेले चिनी ॲप इन्स्टॉल करून त्याची सुरुवात केली. खऱ्या अर्थाने आज चिनी वस्तूंना पर्यायसुद्धा शोधण्याची गरज निर्माण झाली. पण, भारतातातील एका व्यावसायिकाने चिनी वस्तूंना एक मोठा पर्याय 2005 सालीच भारतात निर्माण करून दिला आहे. आपण फक्त त्याच्याकडे बघत नाही इतकेच. आजच्या भागात काही चिनी वस्तूंना भारतात पर्याय निर्माण करून देणाऱ्या या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास आपणासमोर मांडणार आहे. चला तर मग...


1963 साली राजस्थान मधील एका खेड्यात त्याचा जन्म झाला. वडील एक छोटे धान्य व्यावसायिक होते. गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर, व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे संपूर्ण कुटुंब नेपाळला गेले. तिथे त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याच वर्षी त्याचे संपूर्ण कुटुंब पुन्हा भारतात परतले. आता ते दिल्लीत स्थायिक झाले आणि येथे त्याचे पुढील शिक्षण संपन्न झाले.

त्याला नोकरीत फारसा रस नव्हता. त्याला एक व्यावसायिक बनायचे होते. परंतु,वडील जो व्यवसाय करायचे,ते त्याला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळेच वेगळं काहीतरी करण्याचा विचार सातत्याने त्यांच्या मनात डोकावयाचा. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच आपल्या खर्चासाठी त्याने आपल्या मित्रांच्या सोबतीने एक कॅमेरा खरेदी केला आणि बिर्ला मंदिराच्या बाहेर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचे, पर्यटकांचे फोटो काढून द्यायचा.  "आपल्याला या व्यवसायातले फारसे कौशल्य प्राप्त नाही. शिवाय ते लवकर प्राप्त होणार नाही आणि या व्यवसायातून आपल्याला भरपूर पैसा कमावता येणार नाही." याची त्याला जाणीव झाली. मग त्याने हा व्यवसाय बंद करून, ऑडिओ, व्हिडिओ कैसेट विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्याला बक्कळ पैसाही मिळू लागला होता. आता त्याची नजर मोठ्या वस्तूंवर पडू लागली. बाजारपेठेचा अभ्यास केल्यावर त्याला एक गोष्ट लक्षात आली की, भारतात येणाऱ्या बऱ्याचशा वस्तू चीन मधून येतात. त्याने चीनचे मार्केट समजून घेण्याचे ठरविले. काही पैसे जमा करून तो हाँगकाँगला गेला. त्याने तेथील लोकल मार्केटचा अभ्यास केला. व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. 

हा तो काळ होता, ज्या काळात भारतात नुकतेच संगणक यायला सुरुवात झाली होती. त्याने चीन मधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून संगणकाशी निगडीत असलेल्या वस्तूंची आयात करायचे ठरविले. यासाठी 1996 साली जवळ असलेला पैसा गुंतवून एका कंपनीची निर्मिती केली. या कंपनीच्या माध्यमातून त्याने संगणकाशी निगडीत चिनी वस्तू आयात करून विकायला सुरुवात केली. नंतर त्याने याच चिनी वस्तू वापरून भारतात स्वतः संगणक तयार करून विकायला देखील सुरुवात केली. आता जवळ अनुभव मोठा होता. शिवाय, चिनी मार्केटचा खूप मोठा अंदाजही त्याला आला होता. त्यामुळे त्याने 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचा कारखाना उभा केला. आता कंपनीची अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनं भारतातच बनवली जाऊ लागली. चिनी वस्तूंना एक उत्तम पर्याय निर्माण झाला.याच काळात मोबाईल युगाची सुरुवात झाली. लगेच त्याने मोबाईल निर्मितीही सुरू केली. यामुळे अल्पावधीतच कंपनीचा नावलौकिक वाढला आणि ती भारतातील क्रमांक दोनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी बनली. ती कंपनी म्हणजेच इंटेक्स आणि त्या कंपनीचा संस्थापक म्हणजेच नरेंद्र बंसल होय.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की, भारताने चीनमधून येणाऱ्या मालावर बंदी घालायला हवी. आपण भारतीय देखील उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भाषा नेहमीच करत असतो. परंतु, याला फारसे यश येत नाही. कारण, आजअखेर भारतात अनेक चिनी वस्तूंना पर्याय उपलब्ध झालेले नाहीत. परंतु, एक दशकापूर्वी नरेंद्र बन्सल यांनी अनेक चिनी उत्पादनांना भारतात पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फक्त आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत नाही इतकंच.

नरेंद्र बन्सल यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर अनेक गोष्टी लक्षात येईल येतील. व्यावसायिक होण्याचं स्वप्नं खूप आधीच त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे नोकरीचा विचार कधी केलाच नाही. आपल्या ध्येयावर त्यांचं लक्ष सतत केंद्रित होतं. यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची आणि 'नवं ते हवं ' चा स्वीकार करण्याची वृत्ती. याही बाबी त्यांच्या यशासाठी आधारभूत आहेत. याची प्रचिती येते. खरंतर यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी बाजारपेठेची नस ओळखता येणे. फार गरजेचं असतं आणि ही कला बन्सल यांनी मोठ्या कष्टाने साध्य केली. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर विराजमान होऊ शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 165* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/165.html

No comments: