Tuesday, June 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 167

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 167
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

फाळणीनंतर भारतात मोकळ्या हाताने आलेल्या एका व्यक्तीने शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात निर्माण केली आणि भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले. इतकं मोठं यश त्याने कसं मिळविले ? कोण ती व्यक्ती ? जाणून घेऊ आजच्या भागात ? चला तर मग...

1 जुलै 1923 रोजी तत्कालीन भारतातील आणि सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या कमलिया (kamalia) या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्याचे कुटुंबीय सायकल चे विविध भाग विकण्याचे काम करत होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने शाळेत प्रवेश घेतला.

त्यावेळी भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. देश स्वतंत्र झाला खरा. पण, देशाची फाळणी झाली. तो व त्याचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले. त्यांचे सर्वस्व हिसकावून घेण्यात आले होते. त्यामुळे ते रिकाम्या हातानेच अमृतसर येथे आले. त्यावेळी तो 24 वर्षांचा होता. आपल्या कुटुंबाला घेवून नव्याने सुरुवात करण्यास तो सज्ज झाला. आपला जुना व्यवसाय सुरू केला. प्रचंड कष्ट, मेहनत घेवून त्याने व्यवसाय वाढविला. चार पैसे गोळा केले. त्यामुळे मोठं काहीतरी करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला. अशातच पंजाब सरकारने सायकल बनविण्याबाबत एक निविदा प्रसिद्ध केली.  त्याने ही संधी साधायची ठरविली. त्याने टेंडर भरला आणि त्याला तो मिळाला देखील. पंजाब सरकार च्या आर्थिक मदतीच्या जोरावर त्याने आपली नवी कंपनी सुरू केली. या कंपनीत तो सायकलींचे उत्पादन करू लागला. त्याच्या कष्टाच्या, जोरावरच अल्पावधीच सायकल कंपनी नावारूपास आली.

1984 सालं त्याच्यासाठी एक संधी घेवून आले. एका परदेशी कंपनीने दुचाकी वाहन तयार करण्याचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला. त्याने ही मोठी संधी साधली आणि तो प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने काही वर्षातच ही कंपनी लोकप्रिय बनविली आणि त्या कंपनीला जगातील सर्वाधिक मोटारसायकल विकणारी कंपनी बनविली. पण, 2011 साली या दोन्ही कंपन्यांत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी 2013 साली भागीदारी संपुष्टात आणली. हे संकटं मोठं होतं. यामुळे मोठा आघात झाला होता. पण, याही परिस्थितीत त्याने संयम सोडला नाही. कारण, त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता. त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि पहिल्या आठवड्यातच 50 मिलियन मोटारसायकली चे उत्पादन करून नवा इतिहास घडवायला. आपल्या मेहनतीच्या, कष्टाच्या, विश्वासाच्या जोरावर त्याने पुन्हा आपल्या कंपनीला जगातील सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी बनवलं आणि जगभर आपल्या दुचाकी पोहचविल्या. ती कंपनी म्हणजेच हीरो मोटोक्रॉप होय आणि त्याचा संस्थापक म्हणजेच ब्रिजमोहन लाल मुंजाल होय.

मोकळ्या हाताने आलेले, ब्रिजमोहन भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले. त्यांचा हा प्रवास आपल्याला थक्क करणारा आहे. पण, हा प्रवास एका रात्रीत झाला नसून, त्यासाठी रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलं आहे. मिळालेली संधी हेरली आणि त्याचे सोनं केलं आहे. 

व्यक्तीची यशस्वी होण्याची इच्छा तीव्र असेल आणि त्याची कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची जबरदस्त तयारी असेल, तर ती व्यक्ती कितीही गरीब असो, अशिक्षित असो, अडाणी असो, त्याच्या समोर कितीही मोठे संकटं आली, तरी तो या सर्वावर मात करून पुढे जातो आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतो. ब्रिजमोहन यांच्यासमोर देखील फाळणीचं मोठं संकट होतं, तरही या संकटात ते धैर्याने उभे राहिले आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. म्हणूनच ते यशवंत आहेत.

कृपया ब्लॉग फॉलो करा....

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 166* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/166.html

No comments: