Thursday, June 4, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 168

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 168
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

'कायद्याचे शिक्षण घ्यावे.' असा घरच्यांचा दबाव एका तरुणावर होता. पण,त्याला सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. कायद्याची प्रॅक्टिस करायची ? का उद्योग उभारायचा ? असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने कशाची निवड केली असेल ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

1925 साली गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील महुआ नावाच्या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातच घेवून पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला. 'कायद्याचे शिक्षण घ्यावे.' असा घरच्यांचा दबाव त्याच्यावर होता. परंतु, त्याला सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. त्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पण, त्याने 'वकिली करायचीच नाही.' असा ठाम निर्धार केला. त्याच्या या निर्णयाला घरच्यांनी विरोधच केला. पण, त्याने तो जुमनला नाही.

मुंबईमध्ये एका डाईंग व प्रिंटिंग प्रेस मध्ये त्याने कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. कालांतराने एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे शिपाई म्हणूनही काम केले. सततच्या तंगीमुळे त्याच व्यापाऱ्याच्या गोदामात आपल्या पत्नीबरोबर राहण्याची वेळ आली. अनेक समस्या या कालावधीत त्याच्या समोर ठाकल्या. पण, तो त्याला निर्धाराने सामोरा गेला. तो व्यवसायात प्रचंड हुशार. त्याच्या डोक्यात व्यवसायाच्या अनेक कल्पना असायच्या. याच हुषारीवर एका गुंतवणूकदाराने पैसे लावले. आयात निर्यात व्यवसायात चांगला जम बसला.

सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना, लाकूड जोडताना, प्राण्यांच्या चरबी चा ‘गोंद’ वापरताना, बरेच कष्ट घ्यावे लागायचे. या जोडकामासाठी घट्ट स्वरूपातील गोंद पातळ करण्यासाठी उकळावं लागे. त्याच्या घाणेरड्या वासाचा त्रास व्हायचा. हे सारं तो पाहत असे. या समस्येत त्याला संधी दिसली. सिंथेटिक रसायने वापरून, सहजासहजी वापरता येणारा गोंद तयार करता येईल का ? यावर त्याने संशोधन सुरू केले. आणि त्याला या समस्येवर उपाय सापडला. हा उपाय सुतारांना तर आवडलाच. शिवाय, भारतातही तो लोकप्रिय ठरला. तो लोकप्रिय उपाय म्हणजेच फेविकॉल आणि त्याचा निर्माता म्हणजेच 'फेविकॉल मॅन बळवंत पारेख' होय. 

बळवंतजी यांनी कोण काय म्हणतंय ? यापेक्षा आपल्याला काय वाटतंय ? आपल्याला काय करायचं आहे ? यावर अधिक लक्ष दिलं. ते आपल्या ध्येयाबद्दल अधिक सजग होते. त्यांचा निर्धार पक्का होता. त्यामुळेच ते ठामपणे निर्णय घेवू शकले. शिवाय, त्यांच्या व्यवसाय करण्याच्या निर्णयामुळेच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वकिलीचा पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. ते मागे फिरले नाहीत. समस्येत संधी शोधण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. या वृत्तीनेच त्यांना यशाचा मार्ग मिळाला. 

फेविस्टीक, फेविक्विक, डॉकटर फ़िक्सिट, एम् -सील अशा अनेक ब्रँडची मालकीही ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’कडे आहे. 2012 च्या फोर्ब्सच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 45 व्या स्थानी विराजमान होते. यशाला 'चुटकी में' चिकटण्यासाठी आपल्याकडे प्रयत्नांचा, कष्टाचा 'फेविक्विक' असणे, आवश्यक आहे. जो बळवंतजी यांच्या कडे होता. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 167* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/167.html

No comments: