Friday, June 5, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 169

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 169
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

आजच्या भागात अशाच एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत, ज्याला एक समस्या दैनंदिन जीवनात सतत भेडसावत होती. त्याने त्या समस्येवर इलाज शोधला आणि आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे.. कोण आहे तो काय ? त्याला कोणती समस्या भेडसावत होती ? त्यावर त्याने कोणता मार्ग काढला ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..

पंजाब मधील मुक्तसर याठिकाणी शिक्षित आणि मध्यमवर्गीय परिवारात त्याचा जन्म झाला. आई वडील दोघेही शिक्षक,त्यामुळे त्याच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले गेले. आपले शालेय शिक्षण पूर्ण करून, आयआयटी दिल्ली मध्ये प्रवेश मिळवून त्याने आपली बुध्दिमत्ता सिद्ध केली. आयआयटी दिल्ली मध्ये MBA ची डिग्री प्राप्त केली आणि एका कॉन्स्टलिंग फर्म मध्ये नोकरी स्वीकारली.

नोकरीच्या काळात देखील त्याचे विचार त्याला गप्प बसू देत नव्हते. वेगळं काहीतरी करून दाखवण्याचे विचार सतत त्याच्या मनात यायचे. 'यशाचा मार्ग पोटातून जातो.' असं म्हणतात. त्याच्या बाबतीत नेमकं असंच घडलं. तो दररोज दुपारी ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये जेवायला जायचा. तेथे मेनू कार्ड पाहण्यासाठी बरीच मोठी गर्दी असायची. मेनू पाहून ऑर्डर देण्यात बराच वेळ जायचा. या समस्येला तो सतत सामोरा जायचा. जो प्रकार ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये घडायचा,तो शहरातील हॉटेल्स मध्येही. बरं ही त्याच्या एकट्याची समस्या नव्हतीच. ती सर्वांना सतत भेडसावयाची. यावर मार्ग काढण्याचा विचार सतत त्याच्या मनात यायचा. त्याने या समस्येवर उपाय शोधला आणि ताबडतोब त्यावर काम करायला सुरुवात देखील केली.

2008 मध्ये आपल्या एका मित्राच्या मदतीने एक वेबसाईट बनविली. ही वेबसाईट शहरातील विविध हॉटेल्स, त्यातील पदार्थ, त्याची गुणवत्ता,दर याबाबत माहिती द्यायची. ही साईट लोकांच्या अतिशय पसंतीस उतरली. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आणखी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली. घर बसल्या अन्न पुरविणाऱ्या कंपनीची स्थापना केली आणि सारे लक्ष आपल्या कामावर केंद्रित केले. आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर त्याने त्या कंपनीला भारतातील क्रमांक एकची कंपनी बनविली. ती कंपनी म्हणजेच झोमॅटो आणि त्या कंपनीचा सह संस्थापक म्हणजेच दीपेंद्र गोयल होय.

दैनंदिन जीवनात आपण अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जात असतो. या सर्वमान्य समस्या असतात. ज्या आपल्या सोबत इतरांना देखील भेडसावत असतात. सामान्य व्यक्ती या समस्यांसोबत जगत असतात. पण, काही सामान्यांतील असामान्य व्यक्ती या समस्यांवर मार्ग काढतात आणि हा मार्ग त्या लोकांना यशाच्या शिखरावर घेऊन जातो. दीपेंद्र गोयल त्यापैकीच एक.

एक खूपच मामुली वाटणारी समस्या, त्यावर काढलेल्या मार्गाने दीपेंद्र यांना कोठे नेवून ठेवलं ? याची आपणा सर्वांना कल्पना असेलच. आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यावर आपण विचार करतो. पण, ती कल्पना प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी जाणवतात. म्हणून, मागे फिरणे अयोग्य आहे. आपण मागे फिरलो, तरी तो विचार, ती कल्पना इतरांच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतेच. मग, पश्र्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते. 

"यशाची चव चाखायची असेल तर ,आपल्या कल्पनांना कष्टांची फोडणी ताबडतोब द्यायला हवी." दीपेंद्र गोयल यांनी आपल्या कल्पनेवर ताबडतोब काम केले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 168* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/168.html

No comments: