Saturday, June 6, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 170

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 170
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

एका तरुणाने व्यवसाय सुरू करायचा ठरवला. परंतु, त्याची कल्पना तब्बल 25 गुंतवणूकदारांनी नाकारली. मग त्याने काय केले ? तो आपला व्यवसाय उभारण्यात यशस्वी झाला का ? कोण हा तरुण ? जाणून घेऊन आजच्या भागात.चला तर मग..

गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर मध्ये, एका मध्यमवर्गीय कुटुंबात,1973 साली त्याचा  जन्म झाला. त्याचे वडील एक सरकारी कर्मचारी, तर आई गृहिणी होती. त्याला आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण, केंद्रीय विद्यालयात विज्ञान विषयाचे शिक्षकच नव्हते. तरीही, त्याने अतिशय जिद्दीने अभ्यास करून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयआयटी दिल्ली येथे प्रवेश मिळविला. येथे त्याने केमिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आणि पुढे कोलकाता येथील आयआयएममधून एमबीए चे शिक्षण पूर्ण केले.

त्याला नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यात अधिक रस होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने दोन तीन कंपन्यांमध्ये नोकरी केली. परंतु त्याच्या व्यवसाय करण्याच्या विचारांना खतपाणी मिळाले ते अमेरिकेत. येथे तो एका कंपनीत गेमिंग प्रोजेक्टवर काम करत होता. त्यासाठी त्यांना काही लोकांची गरज होती. यासाठी त्याने अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटचा आधार घेतला आणि त्याला अपेक्षित कर्मचारी मिळाले. ही वेबसाईट पहिल्या नंतर, त्याच्या मनात विचार चमकला की, " अशा प्रकारची वेबसाईट आपण भारतात सुरू केली तर ?"

तो भारतात परतला. त्याचा हा विचार त्याने अनेकांना बोलून दाखवला. तब्बल पंचवीस गुंतवणूकदारांनी त्याच्या या कल्पनेवर गुंतवणूक करण्यास नकार दिला. तरीही तो निराश झाला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता. मोठ्या धैर्याने प्रत्येक संकटाला तो सामोरा गेला. त्याने कंपनीची स्थापना केली.आपल्या बुद्धीच्या, कष्टाच्या जोरावर, आलेल्या संकटांवर मात करत काही वर्षातच त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. ती कंपनी म्हणजेच Quikr.com आणि त्याचा संस्थापक म्हणजेच प्रणय चुलेट होय.

Quikr.com या साइटवर विविध प्रकारच्या  मोबाइल, टीव्ही, स्कूटर, घर कोणतीही वस्तू खरेदी अथवा विक्री करण्याची, तसेच नोकरीची जाहिरात मोफत देता येते. दररोज कोट्यवधी लोक या वेबसाइटचा आधार घेत असतात.

व्यवसाय आणि नकार यांचं एक समीकरण आहे. आजपर्यंत जितके व्यवसाय सुरू झालेत, त्या प्रत्येक व्यवसायाला सुरुवातीला अनेक नकार पचवावे लागले आहेत. असे नकार घरच्यांचे, मित्रांचे अथवा गुंतवणूकदारांचे असतात. या नकारावर मात करून अनेक व्यवसाय यशस्वी झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आजवरच्या जीवनात आपल्याला अनेक नकार मिळाले असतील. हे नकार अडगळीच्या स्वरुपात आपल्या मनामध्ये साठलेले असतील. तर ही नकारात्मक विचारांची अडगळ विकून टाकण्यासाठी (दूर करण्यासाठी) Quikr.com ची मदत घ्या. 

प्रणय चुलेट यांनी मिळालेल्या नकारावर मात करत, Quikr.com ला भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन क्लासिफाइड कंपनी बनवले. म्हणूनच ते एक यशवंत आहे.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 169* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/169.html

No comments: