Thursday, June 11, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 175

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 175
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/175.html

एका गरीब परंतु कर्तबगार पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या आणि पित्यासारखीच स्वतःची कर्तबगारी दाखवून, स्वतःला सिद्ध करणाऱ्या आणि केवळ भारतातील नव्हेच तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या एका यशस्वी व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

रोजगाराच्या निमित्ताने येमेन या देशात गेलेल्या एका गरीब पित्याच्या पोटी 19 एप्रिल 1957 रोजी मुकूचा जन्म झाला. चार भावंडात तो सर्वात थोरला. त्याच्या वडिलांचे विचार अतिशय उच्च होते. त्यांची स्वप्नं मोठी होती आणि त्यासाठी ते वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवायचे. काही दिवसांनी वडील भारतात परतले आणि मुंबईत आपला नवा व्यवसाय थाटला.

वडिलांचे कष्ट, त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी पाहत मुकू मोठा होत होता. न कळत बालवयातच त्याने व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली. वडिलांनी व्यवसायात जम बसविला होता. त्यामुळेच आपले महाविद्यालयीन शिक्षण संपवून तो अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. इकडे वडिलांनी व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी मुकुला मदतीसाठी बोलावून घेतले. तो आपले शिक्षण अर्ध्यातच सोडून परतला. त्याने वडिलांच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. त्यावेळी तो केवळ 18 वर्षांचा होता. आता व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी मुकु सांभाळू लागला. वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि मुकु च्या मेहनतीमुळे त्यांची कंपनी यशाचे शिखर पादाक्रांत करू लागली. पण, या यशाला ग्रहण लागले. 2002 साली त्याच्या वडिलांचे निधन झाले. भावासोबत मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी वाटणी करण्याचे ठरले. एकत्र बांधलेली मोळी झटक्यात सुटली.

वडिलांचे निधन आणि भावाबरोबर बिघडलेले संबंध यामुळे काही काळ मुकु नाराज झाला. पण, याहीप्रसंगातून तो लवकरच बाहेर पडला. त्याने आपले संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले. अनेक प्रकारच्या व्यवसायात स्वतःच्या कंपनीचा दबदबा निर्माण केला आणि 2007 साली आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या आणि अथक मेहनतीच्या बळावर तो भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाला. सलग 13 वर्षे तो या स्थानावर विराजमान आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुकु म्हणजेच मुकेश अंबानी होय. 

जगात अशी काही उदाहरणे आहेत की, वडिलांच्या कर्तबगारीपुढे मुलाची कर्तबगारी ठेंगणी किंवा नगण्य वाटते. परंतु, मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्तिमत्त्व असं आहे की, ज्यांनी आपल्या वडिलांच्या कर्तबगार इतकीच स्वतःची कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. धीरूभाई अंबानी यांनी पाचशे रुपयेपासून सुरुवात करून सरतेशेवटी कंपनी पंच्याहत्तर हजार कोटींवर नेऊन ठेवली. तीच कंपनी  मुकेश अंबानी यांनी आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर कंपनीला लाखो कोटींच्या घरात नेऊन ठेवली. ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 13 व्या स्थानी विराजमान आहेत. म्हणूनच ते यशवंत आहेत.


मित्रहो, "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या प्रेरणादायी लेखमालेच्या, सातव्या पर्वाचा आजचा अंतिम भाग. हा प्रवास आपणास कसा वाटला ? ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत नमस्कार...

धन्यवाद..



🎯 यापूर्वीचे सर्व लेखन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *भाग - 174* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/174.html

No comments: