Saturday, July 18, 2020

उपक्रमशील शिक्षक पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

🎯 'उपक्रमशील शिक्षक' पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने...
🎯 श्री.संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.


2019 साली दै. सकाळ मध्ये, शिक्षक दिना च्या पार्श्वभूमीवर 8 सप्टेंबर ला सुरू झालेल्या 'उपक्रमशील शिक्षक' या सदरचा शेवट 10 जानेवारी रोजी झाला. 

या सदरात शिक्षकांच्या कार्याचा, त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा,विविधांगी व्यक्तिमत्वाचा आणि उपक्रमशीलतेचा मागोवा घेण्यात आला. बघता बघता या सदराने शंभरी गाठली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत देखील या सदराला 'ब्रेक' मिळाला नाही. ही गोष्ट या सदराची लोकप्रियता आणि त्याचे अनन्य साधारण महत्त्व दर्शविते. या सदराच्या यशाचे श्रेय जाते, ते श्री.सुनिल शेडगे सर यांना आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण लेखणीला.

या सदराच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिक्षकांचे कार्य सातारा जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. शिक्षकांनी आजवर केलेल्या कार्याला समाज मान्यता मिळाली आणि समाजात जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक शिक्षण याबाबत सकारात्मकता निर्माण झाली. शिक्षकांविषयी समाजात आदराची भावना वाढीस लागली.

'उपक्रमशील शिक्षक' या सदरात माझी दखल घेतली गेली. याचे मोठे आणि सकारात्मक पडसाद 'दुधगाव' या माझ्या जन्म गावी उमटले. माझे आणि आई वडिलांचे कौतुक झाले. आजवर सोसलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आईवडिलांच्या मनी निर्माण झाली. याचं मोठं समाधान मला वाटते आहे.

या सदराच्या अंतिम भागानंतर जिल्ह्यातील सर्वच उपक्रमशील शिक्षकांचा स्नेहमेळावा झाला. या मेळाव्यात शिक्षकांनी 'दै.सकाळ' आणि 'श्री.सुनिल शेडगे सर' यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यातच या सदराचे रूपांतर पुस्तकात व्हावे. हा विचारही जोर धरू लागला. 

या विचाराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले, ते लॉक डाऊन काळातच. श्री.शेडगे सर यांनी कोरोना संक्रमण काळात मोठी जोखीम घेवून, वेळ देवून आणि विनामोबदला, प्रसंगी पदरमोड करून पुस्तकाला मूर्त स्वरूपात आणले आहे. सरांचे हे कार्य अतुलनीय आहे. 

दिनांक 17 जुलै रोजी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले. यावेळी जिल्हा परिषद सातारा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय भागवत साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश फडतरे साहेब, माध्य. शिक्षणाधिकारी श्री. राजेश क्षीरसागर साहेब, प्राथ. शिक्षणाधिकरी मा. कोळेकर मॅडम, शिक्षण सभापती श्री. माणिकराव जगदाळे, 'सकाळ' चे संचालक संपादक श्री श्रीराम पवार सर, 'सकाळ' चे CEO श्री. उदय जाधव सर, संपादक श्री. सम्राट फडणीस, सरव्यवस्थापक श्री. उमेश पिंगळे, सहयोगी संपादक श्री. राजेश सोळस्कर, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. राजेश निंबाळकर, या पुस्तकाचे लेखक श्री. सुनिल शेडगे सर आणि सर्व उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.

लवकरच, हे पुस्तक सर्वांच्या हाती पडेल. हा माझ्यासह सर्वच 'उपक्रमशील शिक्षक' यांच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणाबद्दल 'दै.सकाळ' आणि 'श्री सुनिल शेडगे सर' यांचे शतशः आभार.. 

धन्यवाद..







No comments: