Wednesday, July 8, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 29

बालपण म्हणजे एक सुवर्णकाळ. प्रत्येक व्यक्तीची बालपणीची एखादी विशेष अशी आठवण असतेच. माझ्या ही अनेक आहेत. त्यांपैकीच एक आजच्या भागाचे लेखन करत असताना मला आठवली. एकदा मी यात्रेत फिरायला गेलो होतो. फिरता फिरता मी एका पोस्टर च्या स्टॉलवर आलो. वेगवेगळी पोस्टर पाहताना माझी नजर एका पोस्टरवर पडली. मला ते पोस्टर खूप खूप आवडलं. मी ते खरेदी केलं आणि घराच्या भिंतीवर लावलं. ते पोस्टर होतं एका बॉडीबिल्डरचं. त्याचं ते पिळदार शरीर पाहून,त्याच्यासारखी बॉडी बनवायचं स्वप्नं मी रंगवू लागलो. रोज व्यायामाला जाऊ लागलो. पण,काही दिवसात मी व्यायामाचा नाद सोडला. पण,आजच्या यशवंतानं मात्र माझ्यासारखा नाद सोडला नाही. त्याच्या मेहनतीच्या जोरावर आज तो एक यशवंत आहे. तो यशवंत कोण? हे जाणून घेऊ आजच्या भागात.. चला तर मग..

ऑस्ट्रियासारख्या छोट्याशा देशात त्याचा जन्म झाला. वडील कडक शिस्तीचे पोलिस. पण,काही दिवसांतच त्यांना नोकरी गमवावी लागली. नुकतंच दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि भयानक वाईट अवस्था निर्माण झाली होती.

त्याला फुटबॉल आणि चित्रपट खुप आवडायचे. 'रेज पार्क' नावाचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर,अभिनेता त्याला खुप आवडायचा. त्याच्या सारखा अभिनेता बनण्याचं त्यानं स्वप्नं पाहिलं होतं. एक दिवस त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकांनी सर्वांना जिम दाखवायला नेलं. जिम आणि  जिममध्ये व्यायाम करणारे तरुण,त्यांची शरीरयष्टी पाहून तो भारावून गेला. त्याने आपल्या प्रशिक्षकांना सांगितले कि,"मला जिममध्ये व्यायाम करून बॉडीबिल्डर बनायचं आहे. "प्रशिक्षकांनी फुटबॉल आणि जिम यांपैकी एक निवडायला सांगितलं.त्यानं ' जिम ' निवडलं. त्यावेळी त्याचं वय होतं 14 वर्षं.




पण, खरी अडचण होती वडिलांची. 'मुलानं सैन्यात भरती व्हावं.' ही वडिलांची इच्छा. शिवाय, बॉडीबिल्डिंग ला त्याकाळी विशेष महत्त्व नव्हते. हा,ना करता करता वडिलांनी परवानगी दिली. तो व्यायाम करू लागला. सुट्टीच्या दिवशीही तो जबरदस्तीने जिम सुरू करायला लावायचा.

वयाच्या अठराव्या वर्षी देशाच्या नियमानुसार त्याला सैन्यात भरती व्हावं लागलं. एका शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो ट्रेनिंग सेंटर मधून पळून गेला आणि त्यानं त्या स्पर्धेत पहिला नंबर मिळविला.

तेथून त्यानं मागे वळून पहिलंच नाही. तो ' मि.युनिव्हर्स ' झाला. वयाच्या 23 व्या वर्षी तो सर्वात तरुण ' मि.ऑलंपिया ' बनला. सलग पाचवेळा जिंकला. खुप प्रसिद्ध झाला. त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचं स्वप्नं पूर्णत्वास आलं. कठोर मेहनतीच्या बळावर तो मोठा अभिनेता बनला. त्याला ' टर्मिनेटर ' म्हणून ओळखलं जाऊ लागले. तो टर्मिनेटर म्हणजेच ' अर्नोल्ड श्वार्ज़नेगर ' होय.

काही माणसांची ओळख ते करत असलेल्या कामाने, व्यवसायाने किंवा त्यांना मिळालेल्या पदाने होत असते. पण,अर्नोल्ड हे एकमेव व्यक्ती असे आहेत कि, त्यांच्यामुळे ' बॉडी बिल्डिंग ' ला ओळख प्राप्त झाली. म्हणूनच अर्नोल्ड श्वार्ज़नेगर एक यशवंत आहेत.

आपण पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, जर आपण कठीण परिश्रम घेतले तर आणि तरच आपली स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. याचा प्रत्यय अर्नोल्ड श्वार्ज़नेगर यांच्या प्रवासातून येतो.






No comments: