Wednesday, November 18, 2020

मित्रवर्य राहुल कोळीच्या शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेतील देदीप्यमान कामगिरी बद्दल...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *मित्रवर्य राहुल कोळीच्या शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेतील देदीप्यमान कामगिरी बद्दल...*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

राहुल माझा डी.एड. चा वर्गमित्र. त्याची आणि माझी पहिली भेट जिथं झाली, ते ठिकाण म्हणजे गुरुजन अध्यापक विद्यालय, पाटण. मी आणि राहुलने दोघांनीही या विद्यालयात डी. एड. साठी प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्या वेळी दोघांची भेट झाली. दोघेही एकाच जिल्ह्याचे असल्यामुळे आम्ही एकत्र रुममध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पुढे एक-दोन महिने आम्ही सोबतच राहिलो.

राहुलच्या घरची परिस्थिती तशी बरी. वडील शिक्षण मंडळात असल्याने, अतिशय लाडात वाढलेला. पण, अतिशय हुशार. त्याने बारावीनंतर बीएस्सी च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. डी.एड.ला नंबर लागल्यामुळे मधेच बीएस्सी सोडावं लागलं होतं. कदाचित बी.एससी. शिक्षण त्याला इतकं आवडलं होतं की, त्याचं मन पाटणमध्ये फारसं रमलेच नाही. 

माझ्या घरची परिस्थिती बेताचीच. बाहेरगावी राहून शिक्षण घेणे, मला परवडणारे नव्हतेच. शिवाय तोही पाटण मध्ये रमला नसल्याने, आम्ही दोघांनीही आष्टा येथील लठ्ठे अध्यापक विद्यालयात बदलून येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि यशस्वीही झालो. याच कालावधीत राहुलच्या जिंकण्याची आणि प्रचंड दांडग्या इच्छाशक्तीची जाणीव झाली.

नुकतेच इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय आणि शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. राहुलने आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व अशी कामगिरी करून यश संपादन केले. म्हणूनच, हा लेखन प्रपंच...

2009 साली जत तालुक्यातील जि.प.शाळा डफळापूर येथून राहुलच्या नोकरीस शुभारंभ झाला. काही काळ बिराजदारवस्ती येथे सेवा बजावून, तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे सध्या तो कार्यरत आहे.

डफळापूर शाळेत त्याच्यावर उत्तम संस्कार झाला. त्याच्या उपक्रमशीलतेला, कल्पकतेला आणि बुध्दीचातुर्याला येथेच वाव मिळाला. बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या जोरावर लोकनृत्य, वक्तृत्व, कथाकथन, प्रश्नमंजुषा आदि विविध स्पर्धांत त्याच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर शाळेचा ठसा उमटविला. लोकवर्गणीतून शालेय रंगकाम असो अथवा संगणक कक्ष उभारणी वा शिक्षण महोत्सव. प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यात त्याचा हातखंडा. यात डफळापूर शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांची मोलाची साथ लाभली.

2016 साली तासगाव तालुक्यातील जि.प. केंद्रशाळा बोरगाव येथे बदलीने नेमणूक मिळाली. शाळा मोठी. जिल्ह्यात नावाजलेली. पटही मोठा. तशी जबाबदारीही मोठीच. मनापासून काम करणाऱ्या व्यक्तीला जबाबदारीचे ओझे कधी वाटतच नाही. डफळापूर येथे मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्याने, त्याला बोरगाव येथे आल्यावर जबाबदारीचे ओझे कधी वाटलेच नाही. त्यानेही जबाबदारीचे रूपांतर संधीत केले. आजवर  मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यात तो यशस्वी झाला आहे.

बोरगाव शाळेला आणि संपूर्ण तासगाव तालुक्याला शिष्यवृत्ती परीक्षेचा आणि विविध क्रिडा स्पर्धांचा मोठा वारसा. दरवर्षी बोरगाव शाळेचे अनेक विद्यार्थी जिल्हास्तरावर बक्षिसे संपादित करत असतात. तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतही समाविष्ट असतात. हाच वारसा जपण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.

मुळातच खेळाची विशेष आवड असल्याने, मुलांकडून सराव करून घेण्यात त्याला कसलीच अडचण आली नाही. सहकारी शिक्षकांच्या मदतीने खो-खो व कबड्डी खेळात शाळेच्या दोन संघांना सेमी फायनल गाठण्यात यश मिळाले.

नुकतेच इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. शाळेने नेहमी प्रमाणेच धमाकेदार कामगिरी केली. नवोदय विद्यालयासाठी 3 विद्यार्थी तर, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या 2 तर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 9 असे एकूण 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. 

राहुलच्या आजवरच्या शैक्षणिक कार्यातील ही सर्वोत्तम कामगिरी. बोरगाव शाळेचा आजवरचा इतिहास पाहता, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा अखंड राखण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील ? याची प्रचिती सर्वांनाच आली असेल. 

खरंतर अधिक वेळ देणाऱ्या व्यक्तीच इस्पित साध्य करू शकतात. राहुलने हे यश संपादन करण्यासाठी जादा वेळ दिला आहे. अगदी सुट्टीचा दिवसही यासाठी खर्च केला आहे. तेंव्हा कुठे हे यशाचं शिखर गाठता आलं आहे. 

या सर्वात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तो म.रा.जु.पे. हक्क संघटनेचा जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम करतो आहे. त्याने या संघटनात्मक कामात मोठ्या जोमाने झोकून देऊन काम केले आहे. नागपूर मोर्चा, मुंबई मोर्चा, सांगली मूक मोर्चा अशा अनेक आंदोलनात त्याने प्रमुख भूमिका बजावली आहे. एकाच वेळी वर्ग आणि संघटनात्मक पातळीवर काम करताना त्यानं मिळविलेले यश सर्वांनाच अचंबित करणारं आहे.

जबाबदारी माणसाला सक्षम बनविते. ध्येय गाठण्यासाठी अधिक सजग बनविते. आजवर राहुलच्या जीवनात अनेक मोठी मोठी वादळं आणि संकटं आलेली आहेत. इतकी मोठी वादळं आणि संकटं येऊन देखील, त्याने आपला संयम जरा देखील ढळू दिला नाही. त्याने आपल्या धैर्याच्या, संयमाच्या आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर आपले काम नेटाने पुढे नेले आहे. नेत आहे. उत्तम कामाच्या  जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहे. खडतर परिस्थिती समोर कधीच न हरलेल्या राहुलचे, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!!