Thursday, January 21, 2021

मित्रवर्य विद्यासागर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

 

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *मित्रवर्य विद्यासागर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदिप पाटील,दुधगांव. 9096320023.*


काही व्यक्तींची ओळख त्यांच्या दिसण्यावरून होत असते, तर काहींची त्यांच्या असण्यावर. दिसणं आणि असणं हे व्यक्तिमत्त्वाचे पैलू. दिसणं आणि असणं याचा सुंदर मिलाफ असलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच विद्यासागर पाटील.

विद्यासागर माझा वर्गमित्र. चौथीपर्यंत आम्ही मराठी शाळेत शिकलो. त्यानंतर तो हायस्कूलला गेला. पुढे इयत्ता आठवीच्या वर्गात आम्ही पुन्हा एकत्र आलो. गोरागोमटा असणारा सागर, "बाबर" या टोपण नावाने मित्रांमध्ये प्रसिद्ध.

गावातीलच विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले, तर पुढील शिक्षणासाठी त्याने आष्ट्याचा मार्ग पकडला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. या काळात त्याने गावातीलच एका पशुखाद्य विक्री करणाऱ्या दुकानात सुरुवातीस दिवाणजी आणि नंतर अकाऊंटंट म्हणून नोकरीला सुरुवात केली. पकडली. नोकरी करतच, शिक्षण सुरूच होते. याच काळात गावातील काही तरुणांच्या सानिध्यात आला. त्या तरुणांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्याने थेट कोल्हापूर गाठले आणि हाच निर्णय त्याच्या जीवनातला खरा टर्निंग पॉईंट ठरला. इथेच त्याच्या यशाचा पाया रचला गेला. कोल्हापूरात टीनेटा फार्मा या व्हेटर्नरी कंपनीत एम.आर. म्हणून कामाला सुरुवात केली. कष्ट करण्याची प्रचंड तयारी,जिद्दी स्वभाव, चिकाटी आणि सकारात्मक विचारांची सोबत असणाऱ्या सागरने अवघ्या काही वर्षातच, कंपनीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. एरिया मॅनेजर या पदापर्यंत पोहचला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर टीनेटा फार्मा या व्हेटर्नरी कंपनीच्या, भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. 

सातत्याने कामात मग्न असणाऱ्या सागराच्या कल्पनेने आणि पुढाकारानेच आम्हां दहावीच्या वर्गमित्रांचे सहलीच्या माध्यमातून गेट टू गेदर यशस्वी आणि अविस्मरणीय झाले. वाढदिवस साजरे करणे, स्नेहभोजनाचे आयोजन करणे या माध्यमातून मित्रांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करणे हे त्याच्या आवडीचे काम. 

सागर गावातील विधायक कार्यामध्ये सदैव अग्रभागी असतो. कर्मवीर सार्वजनिक वाचनालय ही त्याचीच कल्पना. आज कर्मवीर सार्वजनिक वाचनालय उत्तम प्रकारे सुरू आहे. गणेश मंदिर आणि हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीत तो कार्यरत असतो.

मोठं स्वप्नं पाहणारा आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या सागरला मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. टीनेटा फार्मा या नावाजलेल्या व्हेटर्नरी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असताना आणि उत्तम पगार मिळत असतानाही स्वतःचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली. सॉलिड फुड्स  दुधगाव या कंपनीच्या माध्यमातून आईसक्रीम निर्मितीत उतरला. मी त्यातला एक सह-भागीदार. सॉलिड आईसक्रीमची धुरा तो उत्तम प्रकारे सांभाळत आहे. 

त्याला वाचनाची प्रचंड आवड. "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" चा तो नियमित वाचक. सारे लेख तो अतिशय आवडीने वाचतो.ऐकतो. "मास्तर, लेखनाला धार आली आहे." ही त्याची चार शब्दांची प्रतिक्रिया, मला खूप मोठी ऊर्जा देवून गेली. त्यामुळेच मोठा पल्ला गाठता आला. 

सहा फुट उंची, गोरावर्ण आणि भारदस्त मिश्या असं सॉलिड व्यक्तिमत्व लाभलेला सागर, त्यांच्या 'दिसण्या' सोबतच त्याच्या 'असण्या' मुळे अधिक जवळचा वाटतो. 

आज त्याचा वाढदिवस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो याच शुभेच्छा. सागर तुला वाढदिवसाच्या सॉलिड शुभेच्छा...


धन्यवाद...





No comments: