Friday, January 22, 2021

गणित गाईड श्री.आकाश जाधव यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गणित गाईड श्री.आकाश जाधव यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदिप पाटील,दुधगांव. 9096320023.*

कर्मवीर सार्वजनिक वाचनालय दुधगांव येथे दिनांक 21 जानेवारी 2021 पासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ मित्रवर्य आकाश जाधव याच्या मार्गदर्शनाने झाला. 

आकाश डी.एड.पासूनचा मित्र. आम्ही एकाच विद्यालयात शिक्षक होण्याचे धडे गिरविले. तसा तो माझा ज्युनिअर. पण, त्याच्या सरळ, साध्या स्वभावाने माझ्यासह सर्वांचा तो जिवलग मित्र बनला. 

आकाश मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील लिंगनुर या गावचा. मिरज पूर्व भाग म्हणजे दुष्काळी भाग. जशी वणवण पाण्यासाठी, तशीच ती शिक्षणासाठी ही करावी लागली. आकाश 13 वर्षांचा असतानाच, त्याची आई देवाघरी गेली. वडिलांनी चार अपत्यांना मामाच्या स्वाधीन करून थेट मळा गाठला. मामाने तुटपुंज्या पगारातही या चारही भाच्यानां उभं करण्याची जबाबदारी पार पाडली. अशा खडतर परिस्थितीत पडेल ते काम करून कष्टाने अन् जिद्दीने तो उभा राहिला.

त्याच्या नोकरीची सुरुवात 2010 साली जिल्हा परिषद शाळा रामनगर ब (आरग) येथून झाली. रामनगर हे मिरज पूर्व भागातील गाव. एखादं काम हाती घेतलं की, जीवापाड मेहनत करून ते पूर्ण करण्यात त्याचा हातखंडा. रामनगर ब ही दुष्काळी भागातील शाळा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने या शाळेला अन् शाळेतील विद्यार्थ्यांना घडवलं, फुलवलं. टँकरने पाणीपुरवठा करून झाडे जगविली. आपली कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर त्याने या शाळेचं रूपडं पालटविलं. जिल्हा परिषद सांगली मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्ह्यात  प्रथम क्रमांक या शाळेला मिळाला. विविध स्पर्धेत त्याने स्वतःचा ठसा उमटविला. शैक्षणिक साहित्य निर्मिती,विद्यार्थी क्रीडा स्पर्धा, शिक्षक क्रीडा स्पर्धा यात त्याने भरघोस यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संलग्नित जि.प.शाळा आरग या आंतरराष्ट्रीय शाळेत झालेली निवड म्हणजेच त्याच्या आजवरच्या वाटचालीतील परमोच्च बिंदूच होय.. 

गणित हा आकाशचा आवडीचा विषय. गणितातल्या कठीण वाटणाऱ्या संकल्पना तो लिलया सोडवतो. त्याची गणिता मधील ही आवड अक्षरगंगा या प्रकाशन संस्थेने हेरली आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी पुस्तक लिहिण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं. गेल्या दहा वर्षात त्याने अक्षरगंगा प्रकाशनासाठी तब्बल 40 हून अधिक पुस्तकांचे लेखन केलेलं आहे. ही बाब आम्हां मित्रांसाठी अतिशय अभिमानाची आहे. पुस्तक लेखनासोबतच आकाशने गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. त्याचबरोबर इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांची गणित विषयाची तयारी व्हावी गणितातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात. या उद्देशाने "गणित गाईड" हे युट्युब चॅनेल सुरू करून, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना त्याने गणित ज्ञानाचे द्वार खुले केले करून दिले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना गणित अतिशय सुलभ करून सांगतो आहे. खऱ्या अर्थाने आकाश अनेक विद्यार्थ्यांसाठी गाईड म्हणूनच काम करतो आहे. त्याला मिळालेली गणित गाईड ही उपाधी सर्वार्थी यथायोग्यच आहे. 

आज त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ दुधगाव मधील काही विद्यार्थ्यांना झाला आहे. पुढेही होईल अशी आशा आहे. आकाश च्या भावी वाटचालीस सॉलिड शुभेच्छा ! 

श्री. आकाश जाधव यांचा संपर्क - 90215 06504

You Tube चॅनेल लिंक - https://youtu.be/QjEsq4537dc


धन्यवाद... !





No comments: