Saturday, January 23, 2021

कोण होईल करोडपती च्या हॉट सीट वर बसलेला प्राथमिक शिक्षक - बाबुराव कुडचे

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *कोण होईल करोडपती च्या हॉट सीट वर बसलेला प्राथमिक शिक्षक - बाबुराव कुडचे *

🎯 *श्री.संदिप पाटील,दुधगांव. 9096320023.*

माझी अन् बाबुराव ची पहिली भेट झाली ते ठिकाण म्हणजे मिरज रेल्वेजंक्शन. ती भेट चिरकाल स्मरणात राहणारी अशीच आहे. यानंतरच आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. कालांतराने आम्ही रूम पार्टनर ही बनलो. मनोर मधील मित्रांत तो 'बॉबी, बाब्या, प्रेमप्रभू' या सारख्या काही टोपण नावांनी ओळखला जातो.

बाबुराव मिरज तालुक्याच्या पूर्वभागातील खटाव या गावचा रहिवासी. आई वडिलांनी अतिशय मेहनतीने घर उभं केलं. त्यांचे कष्ट पाहूनच बाबुराव देखील अतिशय कष्टाळू बनला. कोणतीही लाज न बाळगता, पडेल ते करण्याची त्याची तयारी असते. 

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्याने शिक्षण थांबवून व्यवसाय व शेतीकडे लक्ष द्यावे. असे वडिलांना वाटायचे. परंतु, त्याच्या शिकण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे वडिलांचा नाईलाज झाला. उंडाळे येथील विनाअनुदानित डीएड कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला. येथेही अथक परिश्रम घेतले. परिणामी, 2009 साली ठाणे जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी मिळाली. सध्या तो कवठेमहांकाळ तालुक्यातील रेल्वेस्टेशन अग्रण धुळगाव या शाळेत कार्यरत आहे.

नोकरीला लागल्यावरही अथक परिश्रम करण्याची त्याची सवय काही मोडली नाही. त्याने आपले पुढील शिक्षण सुरू ठेवले. अशातच तो स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या काही मित्राच्या सहवासात आला आणि त्याने स्वतःला झोकून दिले. सातत्य ठेवून अभ्यास सुरू केला. मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा त्यांने सदुपयोग केला. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांतील पूर्व परीक्षेत पास होऊ लागला. पण, अंतिम परीक्षेत म्हणावेसे यश मात्र अजूनही मिळाले नाही. म्हणून, तो नाराज झाला नाही. त्याने आपले प्रयत्न अजूनही सुरूच ठेवले आहेत. याच प्रयत्नांमुळे त्याला IGNOU तून बी.एड. करण्याची संधी मिळाली. 

वर्षामागून वर्षे गेली म्हणून, बाबुराव काही थांबला नाही. 

यश लाभले नाही म्हणून, बाबुराव काही थांबला नाही. 

लोकं हसू लागली, थट्टा करू लागली म्हणून, बाबुराव काही थांबला नाही.

2019 साली त्याच्या जीवनाला आकार देणारी,आधार देणारी, आजवर केलेल्या कष्टाचं चीज करणारी घटना घडली. "कोण होईल मराठी करोडपती ?" या लोकप्रिय शोच्या पर्वात हॉट सीटवर विराजमान होणारा दुसरा स्पर्धक होण्याचा मान त्याला मिळाला. नागराज मंजुळे सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासमोर समोरील हॉटसीट वर बसण्याची संधी त्याला मिळाली. या स्पर्धेत त्याने दहा हजार रुपयांची रक्कम जिंकली. खरंतर त्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा, एक प्राथमिक शिक्षक हॉट सीटवर येतो, ही बाब अधिक मोलाची आणि अभिमानाची आहे. असे मला वाटते. या घटनेतून त्याने आपल्या निंदकांना उत्तर दिलं आहे.

अधिकारी होण्याचं स्वप्नं पाहणारा बाबुराव आजही त्याच जोमाने अभ्यास करतो आहे. SET च्या पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. यातूनच यश मिळेपर्यंत प्रयत्न करण्याची वृत्ती दिसून येते. आता तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांने आता कंबर कसली आहे. दुधगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताहात इतिहास व राज्यघटना या दोन विषयांचे सखोल मार्गदर्शन केले आहे. आपल्या आयुष्यात झालेल्या झालेल्या चुकांबद्दल मुलांना सांगून त्यांच्या वाटेतील अडथळे काहीसे दूर होण्यास मदत केली आहे. 

कितीही अपयश आले तरी, न थांबणाऱ्या बाबुराव कुडचे यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

धन्यवाद...





No comments: