Tuesday, August 17, 2021

गुरुवर्य श्री. राजेंद्र वाकडे सर लिखित "भूतान- एक आनंदयात्रा" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 गुरुवर्य श्री. राजेंद्र वाकडे सर लिखित "भूतान- एक आनंदयात्रा" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने...

🎯 श्री संदीप पाटील, दुधगाव.9096320023.


काल 16 ऑगस्ट 2021 तारळे ता.पाटण येथील सहकारी शिक्षकमित्र, मार्गदर्शक व गुरुवर्य श्री.राजेंद्र वाकडे सर (बाबा) यांच्या "भूतान - एक आनंदयात्रा" या प्रवासवर्णन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साताऱ्याचे लोकप्रिय खासदार मा.श्रीनिवास पाटील,ज्येष्ठ लेखक व विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे, शिक्षण सहसंचालक मा.महेश पालकर, डाॅ.संदीप श्रोत्री अन् काही निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा नयनमनोहर सोहळा 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचा योग आला. 


माझ्या आजवरच्या जीवनातील मी पाहिलेला, अनुभवलेला हा दुसरा प्रकाशन सोहळा. यापूर्वी गुरुवर्य श्री. सुनील शेडगे सर यांच्या "साताऱ्याच्या सहवासात" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास सर्वप्रथम उपस्थित राहण्याचा 'सुयोग' आला होता.


माझी पत्नी 'सौ.राजश्री' अन् 'सौ.वाकडे मॅडम' यांचा घनिष्ठ स्नेह. एकमेकांच्या घरी जाणं-येणं व्हायचं. त्यामुळेच,आमचाही स्नेह वृद्धिंगत होत गेला. कालांतराने आम्हां दोघांनाही एकाच केंद्रात काही काळ काम करण्याची संधी मिळाली. ते आवर्डे केंद्रशाळेत व मी कडवे बुद्रुक येथे कार्यरत होतो. आवर्डे केंद्राचा 'बालआनंद मेळावा' कडवे बुद्रुक येथे आयोजित केला होता. आम्ही दोघांनी एकत्रच या मेळाव्याचे सूत्रसंचालन केलं होतं. या काळात त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. 


वाकडे सरांना तारळे परिसरात प्रेमाने "बाबा" म्हणून हाक मारतात. अगदी त्यांचे विद्यार्थी अन् पालकही. नावाप्रमाणेच कुटुंबवत्सल "बाबा". आपल्या बोलण्या-चालण्या-वागण्यातून सर्वांना आनंद देणारं, जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व. तारळे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म. 'पडेल ते काम' करून, खडतर परिस्थितीतही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले. 


ते खूपच संवेदनशील. त्यामुळे की काय, त्यांच्या लेखणीतून कविता अन् कथांचा जन्म होऊ लागला. विविध वर्तमानपत्रं, मासिकं अन् दिवाळी अंकात त्यांना प्रसिध्दी मिळू लागली. लेखनाला झळाळी येऊ लागली. 


वाचन, लेखन अन् पर्यटन हा आवडता प्रांत असणाऱ्या बाबांचा स्नेह साताऱ्यातील "आयाडियल टीचर्स अकॅडमी"शी जुळला. "शोध सुप्त गुणांचा, ध्यास गुणवत्तेचा" या ब्रीद वाक्याला उराशी बाळगून गेली 21 वर्षे ही अकॅडमी गुणवत्तापूरक उपक्रमाबरोबरच, शिक्षकांना देशविदेशाच्या सफारी घडवून आणते.  या अकॅडमीने 2016 साली कोलकाता, दार्जिलिंग,सिक्कीम अन् भूतान सहलीचं आयोजन केलं. बाबांही या सहलीचा भाग बनले.


2019 च्या पहिल्या लॉकडाऊन ने सहलीची आठवण पुन्हा एकदा ताजी केली. लिहिलेल्या टिपणांनी अन् पन्नाशी ओलांडलेल्या मेंदूने साथ दिली. सहलीचा वृतांत सुरुवातीला कागदावर अन् नंतर मोबाईलवर झळकू लागला. 'ओघवती भाषाशैली अन् वास्तवाचे भान' यामुळे ते लेखन व्हॉट्स ॲपवर प्रचंड लोकप्रिय होऊ लागलं. पुस्तकाची मागणी जोर धरू लागली. 



या पुस्तक निर्मितीच्या प्रत्येक प्रक्रियेत माझा सहभाग राहिला आहे. त्यामुळे सरांची आपल्या पहिल्या साहित्यकृतीच्या निर्मितीमधील धडपड मी प्रत्यक्ष पाहिली,अनुभवली आहे. उगाच लिहायचं म्हणून लिहिलं नाही, अन् छापायचं म्हणून छापलंही नाही. प्रत्येक टप्यावर वास्तवाचं भान राखून त्यांनी लिहिलं आहे. म्हणूनच, "भूतान - एक आनंदयात्रा" हे पुस्तक वाचकांना भूतानपर्यंत घेऊन गेल्याची अनुभूती देतं. बाबांच्या या पहिल्यावहिल्या साहित्यकृतीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!! 


श्री. राजेंद्र वाकडे सर यांचा संपर्क - 9421608223


धन्यवाद...!!!




No comments: