🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *पद्मश्री मुरलीकांत पेटकर सर यांच्या फोनच्या निमित्ताने*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगांव. 9096320023.*
'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' या लेखमालेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या यशवंतांचा जीवन प्रवास आपणा समोर मांडला आहे.
आजवर तब्बल 200 यशवंतांचा जीवन प्रवास 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' मध्ये मांडला आहे. यांमध्ये 135 भारतीय यशवंतांचा जीवनप्रवास अधोरेखित केला आहे.
ही लेखमाला आणि यशवंतांचा प्रवास वाचकांना खूपच भावला आहे. बावीस देशांतील वाचकांच्या 2 लक्ष भेटी ही त्याचीच प्रचिती. तसेच, वेळोवेळी हजारो वाचकांनी याबद्दल मेसेज आणि फोनच्या माध्यमातून माझ्याकडे त्या भावना व्यक्तही केल्या आहेत.
आजवर मी लिहिलेल्या यशवंतांचा प्रवास, त्या त्या यशवंतांपर्यंत पोहचावा. ही माझी मनोकामना आहे. प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्यावर आधारित लेख, वडुज जि.सातारा येथील मित्र श्री. उदय जगदाळे यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविला होता. त्यांची प्रतिक्रियाही मिळाली.
आज मात्र कमालच झाली. सकाळी नऊ वाजता श्री.अर्जुन पेटकर यांचा फोन आला. सुरुवातीला मी त्यांना ओळखलं नाही.पण,"मी मुरलीकांत पेटकर यांचा मुलगा बोलतोय." असं त्यांनी सांगितलं. तेंव्हा मी ओळखलं. त्यांनी लेख आवडल्याचं सांगितलं. नंतर त्यांनी वडिलांना म्हणजेच श्री.मुरलीकांत पेटकर यांना फोन दिला. त्यांनीही माझ्या लेखनाचं मनापासून कौतुक केलं. गोल्ड मेडल पाहण्याकरता पुण्याच्या घरी येण्याचं निमंत्रणही दिलं. लागोलाग व्हॉट्सॲपवर घराचा पत्ताही पाठवून दिला.
'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' या लेखमालेतील 139 व्या भागात श्री.मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित लेख लिहिला होता. सांगली जिल्ह्यातील पेठ या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीकांत पेटकर यांना गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुरा करता आला नाही. वयाच्या सतराव्या वर्षीच ते सैन्यात भरती झाले. सैन्यात राहून खेळात नाव लौकिक मिळवण्याची खूप मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली. 1965 साली भारत-पाक युध्दात ते जबर जखमी झाले. कमरेखालीचे शरीर लुळे पडल्याने, त्यांना चाकच्या खुर्चीचा आधार घ्यावा लागला. पण, अशा कठीण प्रसंगातही त्यांनी धीर सोडला नाही. पुन्हा नव्यानं उभं राहण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी विविध स्पर्धा गाजविल्या.
1972 साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला त्यांनी पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 127 सुवर्णपदकं, तर 154 रौप्यपदकं त्यांनी पटकावली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2018 साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.
ऑलंम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि पद्मश्री विजेत्या व्यक्तीशी झालेल्या संभाषणाने मी एकदम भारावूनच गेलो. अगदी मिनिटभराचं त्याचं बोलणं. मला प्रचंड ऊर्जा आणि चिरकाल टिकणारी आठवण देऊन गेलं.
धन्यवाद...
पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/139.html
No comments:
Post a Comment