🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *'हरित दुधगांव अभियान'च्या निमित्ताने*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगांव. 9096320023.*
विद्यमान परिस्थितीत जशी बाहेरून ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तशी परिस्थितीत भविष्यात पुन्हा येऊ नये. यासाठी तातडीच्या आणि दिर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासाठी मुबलक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे रोपण, संगोपन आणि संवर्धन करण्याची वेळ आली आहे. यासाठीची खरी सुरुवात आपल्यापासून करावी लागणार आहे. हे जाणूनच 'कर्मवीर सार्वजनिक वाचनालय,दुधगांव' च्या माध्यमातून "हरित दुधगांव अभियान" ची मुहूर्तमेढ रोवली.
सर्वप्रथम या अभियानाची रूपरेषा ठरविण्यात आली. रोपे पाहणे, रोपे आणणे, खत आणणे, खड्डे काढणे, आवाहन पत्र तयार करणे, ते वाटप करणे, देणगी गोळा करणे, मान्यवरांना बोलावणे आदी जबाबदारीचे वाटप करण्यात आले. उत्तम नियोजन करण्यात आले आणि मग कामाला वेग आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे आणि वाचनालयाच्या समोर असलेल्या मैदानाच्या भोवतीने 50 झाडे लावण्याचे निश्चित केले.
केवळ झाडे लावल्याने हरित दुधगांव अभियान यशस्वी होणार नाही, तर ही सर्वच्या सर्व झाडं जगविल्यावरच हे अभियान यशस्वी होईल.
खरंतर झाडे जगविण्यामध्ये त्याच्या देखभाली इतकीच त्याची सुरक्षितता ही फार महत्त्वाची बाब आहे. म्हणून, या सर्व झाडांना कुंपण असणं आवश्यक आहे. हे जाणून वाचनालयाच्या माध्यमातून गावातील सहकारी पतसंस्था, सेवाभावीवृत्तीच्या व्यक्तींना कुंपणासाठी आवाहन करण्यात आले. एका कुंपणासाठी रुपये 1250/- इतका खर्च अपेक्षित होता. वाचनालयाच्या आवाहनाला दुधगांवातून आणि दुधगांव बाहेरूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आपल्या किंवा आपल्या जिवलगांच्या वाढदिनाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या स्मरणार्थ एका झाडाचे कुंपण देऊन देणगीदारांनी सामाजिक बांधिलकी जपली.
नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडली. वृक्षारोपणाचा दिवस उजाडला. रविवार दि.18 जुलै 2021 रोजी जि.प.सदस्या मा.सुरेखाताई पाटील, सरपंच मा. विकास कदम, उपसरपंच मा.सीमाताई कोल्हापुरे, ग्रां.प. सदस्य व देणगीदार व गावातील सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करून 'हरित दुधगांव अभियान' ची मुहूर्तमेढ रोवली. वाचनालयाच्या सर्व संचालकांबरोबरच गावातील सेवाभावीवृत्तीच्या अनेक तरुणांनी यामध्ये हिरीरीने भाग घेतला. अगदी सात वर्षाच्या मुलापासून सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींनीही या कामात आपला सहभाग नोंदविला. मा. वनक्षेत्रपाल, वनविभाग सांगली व ग्रामपंचायत दुधगांव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपस्थित मान्यवरांनी वाचनालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 'हरित दुधगांव अभियान' चे मनापासून कौतुक केले. येत्या काळात वाचनालयाला सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचनही दिले.
या अभियानाच्या माध्यमातून यावर्षी केवळ 50 झाडे लावली आहेत. येत्या 5 वर्षात दुधगांवमध्ये 1000 झाडांचे रोपण, संगोपन आणि संवर्धन करण्याचा आणि 'हरित दुधगांव अभियान' यशस्वी करण्याचा 'कर्मवीर सार्वजनिक वाचनालय,दुधगांव' संकल्प आहे. सर्वांच्या सहकार्याने हा संकल्प यशस्वी होईल. असा विश्वास आहे.
धन्यवाद,
'हरित दुधगांव अभियान' व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1 comment:
Mast...
Post a Comment