Monday, April 6, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 139


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 139

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)



जेंव्हा आपल्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडून येतात. तेव्हा, आपल्यातील बहुतेक लोक आपल्या दुःखांमध्ये बुडून जातात. परंतु, अशीही काही लोक आहेत, जे अशा दुःखात देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या अपार धैर्याचे आणि प्रतिभेचे प्रदर्शन करतात. आजच्या भागात अशाच एका शूर सेनानीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

1 नोव्हेंबर 1947 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळील पेठ या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात मुरलीचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुरलीला कुस्तीचा शौक होता. पण,गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुढे पूर्ण करता आला नाही. पण, याच कुस्तीच्या जोरावर मिळविलेल्या शरीरयष्टीमुळे तो वयाच्या 17 व्या वर्षीच सैन्यात भरती झाला.

भरती झाल्यावर लगेचच खेळातील प्राविण्य पाहून 1964 साली टोकियो जपान याठिकाणी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मुरलीला मिळाली. सैन्यात राहून खेळात नाव लौकिक मिळवण्याची त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली होती. पण, त्यातच 1965 साली  भारत - पाक युद्ध सुरू झाले. या युद्धात मुरलीचा प्रत्यक्ष सहभाग होता. देशासाठी लढताना त्याने आपल्या शरीरावर 9 गोळ्या झेलल्या. मुरलीवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्याचा जीवन मरणाची संघर्ष सुरू झाला. तब्बल दोन वर्षाच्या संघर्षानंतर त्याला शुद्ध आली. परंतु, कमरेखालचे शरीर लुळे पडल्याने पुढील आयुष्य त्याला चाकच्या खुर्चीवरच बसून काढावे लागणार होते.

प्रसंग बाका होता. जीव वाचला होता पण, कमरेखाली जीवच नव्हता. याही परिस्थितीत खिलाडूवृत्तीच्या मुरलीने हा मोठा आघात पचवलाच. परिस्थितीवर मात करून व्हीलचेअरवर बसून फिरू लागला.व्यायाम करू लागला. पायातील गेलेला जीव त्याने परत आणला आणि स्वतःला अपंगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांसाठी तयार करू लागला.  वेट लिफ्टिंग, गोळाफेक, भालाफेक, नेमबाजी आदी विविध स्पर्धांत सहभागी होऊन यश मिळवू लागला. 1969 साली अपंगाच्या पोहण्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविल्याने इंग्लंडच्या राणीकडून त्याचा सन्मान झाला. 1972 साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक पटकावून दिलं. अशी कामगिरी करणारा मुरली म्हणजेच "मुरलीकांत पेटकर" होय.

आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 127 सुवर्णपदकं तर 154 रौप्यपदकं त्यांनी पटकावली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2018 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

धाडसी लोकांच्या गोष्टी आपणांस प्रेरणा देतात. खरंतर त्या गोष्टी जीवन किती सुलभ आहे ? याचाच प्रत्यय देत असतात. सोपा मार्ग निवडलेल्या व्यक्ती विस्मृतीत जातात. पण, अवघड मार्ग निवडलेल्या व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने चिरकाल जिवंत राहतात. व्हीलचेअरवर बसून, जीवन व्यतीत करण्याचा "अवघड" मार्ग उपलब्ध असताना देखील मुरलीकांत पेटकर यांनी परिस्थितीवर मात करून, परिस्थिती बदलण्याचा आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा "सोपा" मार्ग निवडला. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.
धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

1 comment:

Muragesh Patil said...

संदीप तुझं लेखन खूप प्रेरणादायी आहे ,रोज यशवंत वाचायला खूप आवडतं