Wednesday, April 8, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 140

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 140

*( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/140.html

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्रतिभासंपन्न असतो. पण, त्या प्रतिभेचा, आपल्यातल्या बेस्टचा जोपर्यंत त्याला शोध लागत नाही. तोपर्यंत तो यशवंत होत नाही. आजच्या भागात अशाच एका व्यक्तीचा जीवन प्रवास आपणासमोर मांडणार आहे की, ज्याला आपल्या प्रतिभेचा शोध वयाच्या 40 व्या वर्षी लागला आणि तो अल्पावधीतच यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला. कोण आहे ती व्यक्ती ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..


31 मार्च 1950 रोजी ओरिसातील बारगढ येथे, एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो दहा वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी तो तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. इतर भावंडांची लग्न झालेली होती. ती आपल्या संसारात मग्न होती. त्यामुळे त्याचा सांभाळ करायला कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळेच स्वतःला जगवण्यासाठी, संघर्ष करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

आपल्या उपजीविकेचेसाठी तिसरीतूनच शाळा सोडली. गावातील एका मिठाईच्या दुकानात भांडी घासण्याचे काम सुरू केले.तब्बल दोन वर्ष त्यांने  मिठाईच्या दुकानात काम केले. त्याच्या संघर्षाकडे बघूनच, गावच्या सरपंचांनी त्याला हायस्कूलच्या हॉस्टेमध्ये नेले. शिकण्यासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याचे काम करण्यासाठी. तब्बल सोळा वर्ष आचार्याचे काम केल्यानंतर, स्वतःचे स्टेशनरी दुकान सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. एका शाळेसमोर त्याने स्टेशनरीचे दुकान सुरू केले.

लहानपणापासून तो देशी लोकगीतं खूप आवडीने ऐकायचा. लोकगीतांचे शब्द त्याच्या मनावर परिणाम करायचे. तो विचारी झाला. वयाच्या 40 व्या वर्षी त्याच्या मनातील वेगवेगळे विचार कागदावर उतरू लागले. कागदावरील विचारांनी रूप घेतले कवितांचे, कवितांनी काव्यसंग्रहाचे आणि काव्यसंग्रहांनी महाकव्यांचे. 1997 साली त्याला लोककवी रत्न म्हणून सन्मानित केले गेले. आणि 2016 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. हा कौशली या भाषेचे संवर्धन करून काव्य रचना करणारा कवी म्हणजेच हलधर नाग होय.

त्यांच्या साहित्याचा समावेश संबलपूर विद्यापीठात केला जाणार आहे. तिसरीतून शाळा सोडावी लागलेल्या हलधर यांच्या साहित्यावर आत्तापर्यंत पाच जणांनी पीएचडी प्रबंध सादर केले आहेत. 

आपल्या प्रत्येकामध्ये काहीनाकाही बेस्ट असतेच. त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. तो जितका लवकर लागेल. तितक्या लवकर आपण यशवंत होतो. वयाच्या 40 व्या वर्षी हलधर यांना आपल्यातील प्रतिभेचा, आपल्यातील बेस्टचा शोध लागला. त्यांनी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धीस दिली.त्यावेळी त्यांच्यावर टीका झाल्या. हे आपले काम नाही. म्हणून, मागे खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य डळमळीत करण्याचे, प्रयत्न केले गेले. आपल्या बाबतीत बऱ्याचदा असेच घडते. आपण लक्ष देतो. परंतु, या सर्वाकडे हलधर यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच एका कवितेपासून सुरू झालेला प्रवास 100 काव्यसंग्रह आणि 20 महाकाव्यांपर्यंत आलेला आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

No comments: