Thursday, April 9, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 141

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 141

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/141.html


सहवास माणसाचं जीवन बदलतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योध्दा झाला. त्याच प्रमाणे आचार्य विनोबा भावे यांच्या सहवासात काही काळासाठी आलेल्या एक सोळा वर्षाच्या अशिक्षित, आदिवासी मुलीची दशा कशी बदलली. तिचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

आत्यंतिक दारिद्र्य, अशिक्षितपणा, नशापान आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आदिवासी समाजात, 15 जुलै 1947 रोजी ओडिसा राज्यातील सेरेना या गावात, एका गरीब कुटुंबात आपाचा जन्म झाला. या समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचं बालपण खाणीवर काम करण्यात जायचं. त्यामुळे इच्छा असून देखील तिला शिक्षण घेता आले नाही.

1963 साली विनोबा भावे यांची भूदान चळवळ ओडिसा राज्यात पोहोचली. 16 वर्षाच्या आपाची भेट विनोबांशी झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आयुष्यभर त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा तिने संकल्प केला. नुसता संकल्प केला नाही तर तो तडीस नेला. आपल्या समाजाची दशा बदलायची असेल, समाजाला दिशा द्यायची असेल, तर समाजातील मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. हा विचार त्या अशिक्षित आपाच्या मनात आला. आणि मग 1964 साली सेरेंदा या गावात एका झाडाखाली, एका अनौपचारिक शाळेची स्थापना केली. सुरुवातीला पालकांनी विरोध केला. पण, त्यांची मनधरणी करण्यात तिला यश आले.

आपाची शिक्षणाविषयी आस्था बघून, समाजसेवा करणाऱ्या काही महिलांनी तिला शिक्षण दिले. स्वतः शिक्षण घेत-घेत,तिने मुलांना शिक्षण दिले. शाळा चालवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. मोठ्या प्रमाणात निधी कमी पडू लागला. म्हणून ती थांबली नाही. भाजी विकून खर्च भागवू लागली. एव्हाना तिची धडपड पालकांच्या लक्षात आली. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढल्याने, जागा अपुरी पडू लागल्याचे लक्षात येताच, पालकांनी शाळेची इमारत बांधून दिली. आज या शाळेची दोन मजली इमारत आहे.शिवाय सहा दशकांच्या मेहनतीमुळे खाण परिसरात तब्बल वीस शाळांची उभारणी आपाने केली आहे. आपाच्या या कार्यामुळे परिसरात तिला "तुलसीआपा" या नावाने ओळखले जाते. ही "तुलसीआपा' म्हणजेच "तुलसी मुंडा" होय.

सहवास माणसाचं जीवन बदलतो. आपण ज्यांच्या सोबत रहातो, त्यांच्या विचारांचा, रहाणीचा, बोलण्याचा आणि वागण्याचा अंमल आपल्यावर होत असतो. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढलं तर, बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून  जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले, तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. बाभळीच्या सहवासात जायचं कि चंदनाच्या ? हे आपण ठरवायचं. तुलसी मुंडा यांना विनोबांचा सहवास लाभला. म्हणूनच, त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलली.

तुलसी मुंडा याच्या कार्याची दखल घेऊन 2001 साली भारत सरकारने ' पद्मश्री ' हा किताब देऊन,तर 2011 साली ओडिसा सरकारने 'ओडिसा लिविंग लिजेंड' हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केलेला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.





🎯 "तुलसी गौडा" यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/129.html

No comments: