Friday, April 10, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 142

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 142

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/142.html

एकेकाळी आपल्या मुलाशी संघर्ष कराव्या लागलेल्या एका अडाणी महिला शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...


ओडिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यातील एका आदिवासीबहुल गावात अडाणी कमलाचा जन्म. तिचा विवाह पात्रपूट या गावात झाला. शेती हा गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय. विशेषतः भात हेच आदिवासींचे मुख्य पीक.

पात्रपूट या गावात लग्न करून आल्यानंतर तिला एक गोष्ट जाणवली की, या गावातील लोक दोन ते तीन प्रकारच्या वेगवेगळ्या देशी वाणांचे उत्पादन घेत आहेत. पिकाच्या कापणीनंतर ते आपसात बियाण्यांची देवाणघेवाण करायचे. त्यामुळे, या गावात मोठ्या प्रमाणावर देशी वाणांची उपलब्धता असायची. पण, काही वर्षानंतर ही परिस्थिती बदलली. गावातील शेतकरी नव्या कमी दर्जाच्या पण, अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे देशी वाणांचे प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे तिच्या लक्षात आले. शिवाय देशी वाणांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे तिच्या लक्षात आले.

देशी वाणांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे, तिने मनाशी पक्के ठरवले आणि तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. पात्रपूट गावाच्या 20 किलोमीटर परिसरात असणाऱ्या वाड्यावस्त्यांवर जाऊन कमलाने वेगवेगळ्या जातीच्या देशी वाणांचे संकलन करायला सुरुवात केली. खराब रस्ते, डोंगरदऱ्या, जंगल आदी पायी प्रवास करून तिने वाणांचे संकलन केले. या कामात तिच्या मुलाच्या विरोधाला तिला तोंड द्यावे लागले. पण, तरीही आपले काम नेटाने पुढे नेत, कमलाने 100 हून अधिक देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण केले आहे. सोबत पारंपरिक शेती चा प्रसारही केला आहे. कमलाच्या या कामाची दखल घेत ओडिसा सरकारने तिला "सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी" या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ती "सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी" म्हणजेच "कमला पुजारी" होय. 

कमला पुजारी यांचे काम हे एक दोन वर्षांचे नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची चार दशकं खर्ची घातली आहेत. शेकडो मैलांचा पायी प्रवास करून, अनेक वड्यावस्त्या पालथ्या घालून त्यांनी शेकडो देशी वाणांचे संकलन केले आहे. त्याचे संवर्धन केले आहे. हे काम करताना त्यांना आपल्या मुलाच्या विरोधाला देखील तोंड द्यावे लागले आहे. परंतु, त्याही परिस्थितीत त्यांनी आपले काम थांबविले नाही. आपण फक्त काम करत राहायचं. ते काम चं इतकं मोठं होतं की, विरोध आपोआप गळून पडतो. कमला पुजारी यांनी देखील हेच केलं. त्यामुळं मुलाचा विरोध गळून पडला.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ 
गीतेतील या श्लोकानुरुप कमला पुजारी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता काम करत राहिल्या. त्यांच्या कामाचे फळ म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार दिला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"बीजमाता राहीबाई पोपरे"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/09/113.html

No comments: