Saturday, April 11, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 143

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 143

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/143.html

एक उत्तम विद्यार्थी, उत्कृष्ट फुटबॉलपटू आणि डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या एका मुलाला शालेय शिक्षण अर्ध्यातून सोडून लागले. जी वेळ आपल्यावर आली, ती इतरांवर येऊ नये. या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचा पद्मश्री पुरस्कार मिळविण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चला तर मग..

11 नोव्हेंबर 1958 रोजी ओडिसा राज्यातील कटक या शहरात एका गरीब चहावाल्याच्या घरी प्रकाशचा जन्म झाला. प्रकाशच्या वडिलांनी दुसर्‍या महायुद्धात सहभाग घेतला होता. युद्धातून परतल्यानंतर, अथक प्रयत्नानंतरही नोकरी मिळाली नाही. सरतेशेवटी घर चालवण्यासाठी त्यांनी बक्सी बाजार येथील झोपडपट्टी जवळ चहाचे दुकान सुरू केले.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच प्रकाश दुकानावर काम करू लागला. शाळेत उत्तम विद्यार्थी,उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून तो नावाजला जायचा. डॉक्टर बनण्याचे तो स्वप्नं पाहू लागला. परंतु तो अकरावीत असतानाच त्याचे वडील गंभीररित्या आजारी पडले. घरची जबाबदारी प्रकाशवर पडली. कुटुंब जगविण्यासाठी नाईलाजास्तव शिक्षण अर्धवट सोडून, तो चहाच्या दुकानावर काम करून जबाबदारी पार पाडू लागला. डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्नं अपूर्णच राहिले. पण, अर्धवट सोडल्याची खंत त्याच्या मनात कायम राहिली.

चहाच्या दुकानाभवतीचा परिसर झोपडपट्टीचा. येथील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामाला पाठवायचे. येणाऱ्या पैशातून दारू प्यायचे. ही बाब प्रकाशच्या निदर्शनास आली. अर्धवट शिक्षण सोडल्याची खंत अजूनही प्रकाशच्या मनात होती. उनाडक्या करणाऱ्या या मुलांनी शिकायला हवे. असे विचार त्याच्या मनात डोकावू लागले. "जे आपल्या बाबतीत घडले, ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये." परिसरात शाळा नसल्याने आपणच काहीतरी करावे. या विचाराने झपाटला. सन 2000 साली त्याने झोपडपट्टीतल्या या मुलांसाठी स्वतः च्या घरातच शाळा सुरू केली. पहाटे चार ते सकाळी दहा पर्यंत चहाच्या दुकानावर काम करून, शाळेत अध्यापन करून, अनेक अडचणीवर मात करून, प्रकाशने शाळा नावारूपास आणली. शाळेसोबतच प्रकाशदेखील इतका नावारूपास आला की, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" कार्यक्रमात प्रकाशच्या कामाचा गौरव केला. हा प्रकाश म्हणजेच " देवारपल्ली प्रकाश राव " होय. 

या जगात अशी कोणतीच समस्या नाही की, ज्यावर उपाय नाही. ज्या व्यक्ती स्वतःपासून सुरुवात करतात. केवळ त्यांनांच समस्येवर उपाय सापडतो. "उनाडक्या करत फिरणारी झोपडपट्टीतली मुलं'' ही समस्या,ना मुलांची होती ना त्यांच्या पालकांची होती. ती समस्या प्रकाश राव यांची होती. 'कोणत्याही समस्येवर / गोष्टीवर रडत बसणं.' हा उपाय कधीच असू शकत नाही. राव यांनी त्यांच्या समस्यांवर स्वतः च उपाय शोधला. 

पालकांचा विरोध, आर्थिक अडचण, कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारी या सर्वांवर मार्ग काढत, प्रकाश राव यांनी झोपडपट्टीतल्या मुलांच्या अंधःकारमय जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे. त्यांच्या या दीपस्तंभासम कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 2019 साली त्यांना " पद्मश्री " हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव
9096320023.



🎯 *"हरेकला हजब्बा"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/128.html



No comments: