Friday, March 27, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 128

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 128*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या एका अडाणी, अशिक्षित "अक्षर संता" चा हा प्रेरणादायी प्रवास 

कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्हापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवापडापू या छोट्याशा आणि अतिमागास खेड्यात 1952/53 साली या संताचा जन्म झाला. तो अडाणी, अशिक्षित. त्यामुळे जन्म कधी झाला. याची नोंद नाही. त्याच्या अडाणी असण्याचे कारण ही तसेच. या गावात शाळाच नव्हती. या गावात पहिली शाळा सन 2000 साली सुरू झाली. 

कोणतेही शालेय शिक्षण नसल्यामुळे, अगदी लहानपणापासूनच तो व्यवसायाकडे वळला आणि फळविक्रेता झाला. त्याने संसार थाटला. अगदी सुखाचा. 

सारे काही सुरळीत सुरू होते आणि एक दिवस एक अशी घटना घडली की, त्या घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. एक विदेशी जोडपे त्याच्याकडे संत्री खरेदीसाठी आले. त्यांनी संत्र्यांची किंमत विचारली. पण, खूप प्रयत्नांनंतरही, त्या जोडप्याला किंमत समजावून सांगण्यात, तो अपयशी ठरला. त्यामुळे ते जोडपे संत्री खरेदी न करताच निघून गेले. 'ते विदेशी जोडपे बोलत असलेली भाषा आपल्याला समजली नाही. म्हणून आपण त्यांना संत्री विकण्यात अपयशी ठरलो.' हे समजण्याइतपत तो शहाणा होता. हा प्रसंग अतिशय छोटा आणि साधा. पण, या प्रसंगाने त्याच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

त्याने मनोमन विचार केला, ''आपण अडाणी असल्यामुळे ह्या जोडप्याला फळ विकण्यात अयशस्वी ठरलो. आपल्या गावात अशी कितीतरी मुलं आहेत, जी अशिक्षित आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे. आज मी अडाणी असल्यामुळे माझी ही अवस्था झाली. उद्या त्या मुलांवरही अशीच वेळ येऊ शकते. जे आपल्या वाट्याला आले, ते त्या मुलांच्या वाट्याला येवू नये. यासाठी त्यांना शिक्षण मिळणे. गरजेचे आहे. यासाठी मला काहीतरी केले पाहिजे.''

या विचाराने त्याने गावात शाळा स्थापन करण्याचा निर्धार केला. गावातील लोकांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि खूप प्रयत्नानंतर सन 2000 साली गावातल्या मशिदीत पहिली प्राथमिक शाळा सुरू करण्यात तो यशस्वी झाला. (आपल्या भारत देशाची हीच मोठी शोकांतिका आहे. येथे मंदिराचे कळस उंचच्या उंच आहेत आणि शाळांचे छप्पर मात्र गळके. स्वातंत्र्यानंतरची पन्नास वर्ष ज्या गावात शाळा नाहीत. तिथं मंदिरं आहेत.)

शाळा सुरू झाल्यानंतर स्वच्छता करणे आणि मुलांना पिण्याचे पाणी उकळून ठेवणे. ही कामे तो नित्यनियमाने करू लागला. आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा तो शाळेसाठी नियमित द्यायचा. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. तेंव्हा जागेची अडचण निर्माण होऊ लागली. पण, हातावर पोट असलेल्या त्या संत्री विक्रेत्याचा निश्चय दृढ असल्याने तो डगमगला नाही. कर्ज काढून त्याने शाळेसाठी जमीन खरेदी केली. वर्गखोल्या बांधल्या. यासाठी त्याला समाजाची, सामाजिक संस्थांची मदत झाली. त्याच्या अथक प्रयत्नांनी 2008 साली गावात शासकीय माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. 

समाजासाठी तो खूप मोठं काम करत होता. स्वतः अशिक्षित, अडाणी असून देखील इतरांचे जीवन सुखावह व्हावे. यासाठी तो एखाद्या संत महात्म्या प्रमाणे झटत होता. म्हणूनच लोकांनी त्याला "अक्षर संत" ही उपाधी दिली. या "अक्षर संता" चे समाजासाठीचे कार्य पाहून भारत सरकारने 2020 सालचा 'पद्मश्री' हा मानाचा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे आणि हे "अक्षर संत" म्हणजेच हरेकला हजब्बा होय. 

तुटपुंजी कमाई असताना देखील, त्यांनी पाहिलेलं स्वप्नं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम यामुळेच शाळा निर्मितीचे त्यांचे स्वप्नं पूर्ण होऊ शकले. हजब्बा यांच्या जीवन प्रवासातून एक बोध मिळतो की, "माणसाचा विचार मोठा असला पाहिजे आणि त्या विचाराला कृतीची जोड असली पाहिजे. तरच स्वप्नं सत्यात येऊ शकतात." हजब्बा यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी. म्हणून मंगलोर युनिव्हर्सटीमध्ये मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित पाठ शिकवला जातो. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

एक महत्त्वाचे...
हजब्बा यांच्या जीवन प्रवासातून तुम्हाला वेगळा बोध मिळाला असेल तर ? हे मला नक्की कळवा. 


उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!



🎯 काही दृष्ट प्रथांमुळे अनेक महिलांना, दलित कुटुंबांना कधी मान-सन्मान लाभतच नाही. त्यांच्या उलटपक्षी पदरी अपमानच. अशा वाईट प्रथा हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/127.html


🎯 जन्माला येणारा प्रत्येक जीव हा यशस्वी होण्यासाठीच जन्माला आलेला असतो. परंतु, प्रत्येकाचेच यश हे अलीबाबाच्या गुहेत बंदिस्त असते. या यशाला गुहेतून बाहेर काढण्यासाठी एकच कळ या जगात अस्तित्वात आहे. ती कळ म्हणजेच प्रयत्न होय. प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर अलीबाबाच्या गुहेत बंदिस्त असलेले यशाला बाहेर खेचून आणणाऱ्या एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/07/101.html

No comments: