Saturday, April 11, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 144

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯   भाग- 144

*( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/144.html


2001 सालची घटना. दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान मा.श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. तामिळनाडूतील एका अशिक्षित महिलेला तो पुरस्कार मिळाला. ज्यावेळी ती महिला व्यासपीठावर आली. तेव्हा मा. पंतप्रधानांनी त्या महिलेचे चरणस्पर्श केले. असे का घडले असावे ? कोण होती ती महिला ? काय आहे तिचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात.चला तर मग...

तामिळनाडूतील मधुराई पासून 15 कि.मी. अंतरावर असलेले, दाट जंगलात वसलेला एक गाव म्हणजेच पुलूचेरी. चिन्ना नामक 12 वर्षीय मुलगी पेरुमलशी विवाह करून आली. लग्नानंतर काही दिवसातच अशिक्षित चिन्ना आपल्या पतीसोबत शेजारच्या गावातील शेतावर मजुरीसाठी जाऊ लागली. सोबतीला शेजारच्या गावातील अनेक महिला देखील असायच्या. चिन्ना ला दोन मुले आणि तीन मुली झाल्या.

शेतात काम करून मिळणारी मजुरी अतिशय अल्प असल्यामुळे, चिन्ना ने आवाज उठविला. पण, कामाला जाणाऱ्या अनेक महिलांमध्ये एकी नसल्यामुळे पगारात वाढ होऊ शकली नाही. सर्वच लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. तो यासाठी तीनशे पटीने व्याज आकारणी करायचा. त्यामुळे कितीही कष्ट केले तरी कर्ज फेडणे अशक्य होते. चिन्नाची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. सर्वांचीच पिळवणूक व्हायची. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.असे चिन्नाला मनोमन वाटायचे आणि यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला.

1990 साली आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चिन्नाने महिला बचत गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महिलांनी नंतर पुरुषांनी तिच्या या कल्पनेस विश्वास ठेवला नाही. 15 महिला आणि 20 रू प्रती महिना असा प्रवास सुरू झाला. अतिशय अल्प दरात गटातील महिलांना कलंजियन (छोटे कर्ज) मिळू लागले. कर्ज घेवून नवे व्यवसाय सुरू होऊ लागले. यातून महिला, समाज सक्षम होऊ लागले. आज अनेक राज्यात ही कल्पना पोहोचली आहे. चिन्ना आणि तिची कल्पना खूप प्रसिद्ध झाली. तिच्या वरील माहितीपट पाहून तत्कालीन पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी इतके प्रभावित झाले की, चिन्ना ला स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करताना, त्यांनी तिचे चरण स्पर्श केले. ती चिन्ना म्हणजेच चिन्ना पिल्लई होय. 

ज्या समस्या इतरांच्या समोर होत्या, त्याच चिन्ना पिल्लई यांच्याही समोर होत्या. इतरांनी समस्यांपासून पळवाटा शोधल्या. पण, चिन्ना पिल्लई यांनी त्यावर वाट शोधली. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा पद्मश्री हा किताब देऊन सन्मान केला आहे. 

संकटं माणसाची परीक्षा घेत असतात. म्हणून संकटात माणसाने डगमगू नये. प्रत्येक संकटात एक संधी असते आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करता आले पाहिजे. आपण सुशिक्षित आहोत. पण, गरीब, अशिक्षित, अडाणी असून देखील चिन्ना पिल्लई यांनी आपल्या समस्यांवर उपाय शोधला. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"बीजमाता राहीबाई पोपरे"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/09/113.html

No comments: