Sunday, April 12, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 145

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯 भाग - 145.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/145.html

सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिलेल्या एका हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला, कुटुंबाच्या अचानक बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावे लागले. त्याच तरुणाच्या नावावर आज 100 हून अधिक पेटंट आहेत. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

7 एप्रिल 1962 रोजी आसाम राज्यातील लखीमपुर येथे एका व्यापार्‍याच्या घरी उद्धबचा जन्म झाला. तो इतका हुशार आणि बुद्धिमान की, त्याला सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिला गेला.  आठवीत असतानाच अकरावी आणि बारावीचे अवघड प्रश्न सहज सोडवायचा. त्याच्या जिज्ञासू वृत्तीने त्याला अनेकदा वर्गाच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा मिळाली.

शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण वडिलांच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे, त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला. बँकेने त्यांना तात्काळ घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवली. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे, निव्वळ अशक्य झाले होते. त्यामुळेच, त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याचा मोठा आघात सहन करून त्याने नोकरीला सुरुवात केली.

"माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी, त्यातून बाहेर पडण्याची एक संधी त्याच्या समोर येतेच. फक्त ती संधी शोधण्याची नजर पाहिजे." एक पॉलिथिन बनवणारे,पाच लाख रुपये किंमतीचे विदेशी यंत्र, कमी पैशात बनविण्याचे आव्हान उद्धबच्या समोर ठेवण्यात आले. "प्रत्येक संकटात एक आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी असते." नेमकं हेच त्यांना हेरलं. आपल्या बुद्धीचा अन् कौशल्याचा वापर करून मिळालेल्या आव्हानाचा सामना करून, त्या विदेशी यंत्राची, अगदी जशीच्या तशी भारतीय कॉपी बनवली.तेही केवळ 67 हजार रुपयांमध्ये. या आव्हानामुळे उद्धबला आपल्यातील क्षमतेचा नव्याने शोध लागला. अनेक लोकांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला, पण, तरीही त्याला भीक न घालता त्याने आपले संपूर्ण लक्ष संशोधनावर केंद्रित केले. 2012 साली त्याने बनवलेल्या एका यंत्रासाठी नासाने एक्सेप्शनल टेक्नॉलॉजी अॅचिवमेंट अॅवार्ड ने त्याला सन्मानित केले. तो जगप्रसिद्ध भारतीय संशोधक म्हणजेच डॉ. उद्धब भराली होय.

डॉ. उद्धब भराली यांच्यासमोर परिस्थितीने मोठे संकट मोठे आव्हान उभे केले. पण, आलेल्या आव्हानात सुद्धा त्यांनी संधी शोधली. यामुळेच त्यांना आपल्यातील क्षमतेचा शोध लागला. म्हणूनच त्यांच्याकडे 100 हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेवून भारत सरकारने त्यांना " पद्मश्री '' मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

आज संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपल्या घरात लॉकडाऊन आहे. या आव्हानाच्या काळात आपण आपल्यातील क्षमतेचा शोध घेतला पाहिजे. धावपळीच्या युगात अशी वेळ,अशी संधी परत कधी मिळेल ? हे सांगता येत नाही. म्हणूनच या आव्हानात संधी शोधण्याचा प्रयत्न करा.


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"चिन्ना पिल्लई"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/144.html

No comments: