Tuesday, April 14, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 146

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 146.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/146.html

ध्येयाने झपाटलेल्या,त्यासाठी तीन एकर जमीन विकणाऱ्या, लोकांनी वेडा संबोधलेल्या एका ध्येयवेड्या इसमाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

तेलंगणातील खमाम जिल्ह्यातील रेड्डीपल्‍ली या गावात रमैया चा जन्म झाला. लहान मुलं अनुकरणशील असतात. आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक चांगल्या वाईट सवयींचे अनुकरण करत असतात. लहानपणापासूनच रमैया आपल्या आईच्या प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करायचा.

त्याची आई झाडं लावायची.बीज संग्रह करायची. रोपं तयार करून ती लावायची आणि त्याचे संवर्धन करायची. बऱ्याचवेळा झाडे लावण्यासाठी, बीज शोधण्यासाठी रमैयास ती सोबत घेवून जायची. त्यामुळे रमैयाला देखील झाडे लावण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे प्रचंड वेड लागले. त्याला ती सवयच लागली. शाळेत जात असलेल्या रमैयाला आईसोबत बीज गोळा करणे, झाडे लावणे हे त्याचे आवडीचे छंद जोपासता येत नव्हते. त्यामुळे तो बेचैन व्हायचा. शिवाय, शाळेत शिक्षकांनी झाडांचे महत्त्व समजून सांगितल्यानंतर झाडे लावण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. त्याने मनोमन आयुष्यभर झाडे लावण्याचा संकल्प केला.आपला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी दहावीतून त्याने शाळाच सोडली.

रोपं शोधणं,ती लावणं,त्याचं संवर्धन करणं,बीज संग्रह करणं. हा त्याचा नित्याचा दिनक्रम बनला. सायकलवर विविध प्रकारची रोपे घेवून, गावाबाहेर जायचा, मोकळी जागा दिसली की, त्याठिकाणी रोपं लावायचा. त्याचा हा दिनक्रम पाहून लोकं त्यांच्यावर हसायची. त्याला वेडा म्हणून हिणवायची. पण, या सर्वांकडे दुर्लक्ष करून, तो गतीने पुढे जायचा. तो आज इतका पुढे गेला की, त्याने आजवर एक करोडहून अधिक झाडे लावली आहेत. म्हणूनच त्याचा गौरव "The Tree Man Of India" असा केला जातो. तो ट्री मॅन म्हणजेच "दरिपल्ली रमैया'' होय. 

आपल्या ध्येयपूर्तीसाठी ध्येयवेड्या रमैया यांनी तीन एकर जमीन विकली आहे. रमैया यांच्या कार्याची दखल घेऊन "एकेडमी ऑफ यूनिवर्सल ग्‍लोबल पीस" ने "डॉक्‍टरेट" ही मानाची पदवी दिली आहे. शिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे.

असं म्हणतात, 'वेडी माणसं इतिहास घडवितात आणि शहाणी माणसं ती वाचतात,तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात.' पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं. तो शहाण्याचा घास नव्हे. कारण इतिहास घडवायला लागणारं शौर्य, धाडस, धोका पत्करण्याची क्षमता ही फक्त वेड्या माणसातच असू शकते. रमैया यांच्याकडे ते शौर्य, ते धाडस आणि धोका पत्करण्याची क्षमता होती. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"डॉ. उद्धब भराली"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/145.html

No comments: