🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 113*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. याच नगर जिल्ह्यातील आदिवासी भागातील, एका अशिक्षित आदिवासी आजीचा बीबीसीने जगातील सर्वात शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत समावेश झाला. तिच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...
नगर जिल्ह्यातील कोंभाळणे या गावात तिचा जन्म एका आदिवासी, अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांना आठ अपत्य. त्यात तिचा नंबर पाचवा. ती जेंव्हा आठ वर्षाची झाली तेंव्हा तिच्या आईचे निधन झाले आणि नऊ महिन्याच्या धाकट्या बहिणीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. बहिणीचा सांभाळ करणे आणि वडिलांबरोबर शेतात मदत करणे. हा तिचा दिनक्रम. त्यामुळे तिला शाळेत जावून शिक्षण घेता आलेच नाही.
वयाच्या बाराव्या वर्षीच एका शेतकऱ्यांसोबत तिचे लग्न झाले. नवऱ्याला शेतीच्या कामात मदत करून तिने आपला संसार फुलविला. तिला मुलं झाली. ती मोठी झाली. त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. हायब्रीड वाणांचा, रासायनिक खतांचा वापर करून, उत्पन्नात वाढ होऊ लागली. मुलांची लग्न झाली. ती आजी झाली. नातवंडा बरोबर खेळण्यास मोकळी झाली. असा तिचा संसार, अगदी सोन्यासारखा.
सारं काही सुरळीतपणे सुरू असताना, तिची नातवंड सारखी आजारी पडू लागली. त्यांना घेऊन ती दहा-दहा किलोमीटर लांब दवाखान्यात जाऊ लागली. यामुळे ती खूप बेचैन झाली. ती सतत विचार करू लागली. "आपण इतकी वर्ष जगतोय. आपण कधीच कोणत्याही आजाराला बळी पडलो नाही. मग हे आपल्या नातवंडांच्या बाबतीत का घडतं आहे ?" ती अडाणी जरी असली तरीदेखील, या प्रश्नाचे नेमके उत्तर तिला सापडले. नेमकं आपण कुठे चुकतोय ? याचा तिला शोध लागला.
"आपण जे खातोय, ते हायब्रीड आहे आणि ते किती खाल्लं तरी ताकत वाढणार नाही. त्यामुळेच, आपली नातवंडं आजारी पडता आहेत. परंतु, गावरान वाणं खाल्ले, तर नक्कीच आजार पळून जाईल." तेंव्हा तिने ठरविले की, हायब्रीड वाण न वापरता गावरान वाणांची लागवड करावी.
तिने नुसतं ठरवलंच नाही, तर त्या वयात कामाला लागली सुरुवातीला घराच्यांचा विरोध झाला. पण, त्या अडाणी आजीचं बोलणं हळूहळू पटायला लागलं. गावातील लोकं, बचत गटातील बायका, शेजारीपाजारी तिला वेड्यात काढू लागले. समाजात होणाऱ्या चेष्टेने ती कधीच बेचैन झाली नाही. परंतु पावसाचे कमी प्रमाण असलेल्या भागात देशी वाणांची जपणूक करायची कशी ? हे मोठं संकट तिच्यासमोर उभं होतं. त्यावरही तिने मात केली. कधी बैल गाडीने, तर कधी डोक्यावरून पाणी आणून वाणं जगविली.
तब्बल वीस वर्षे तिने अनेक संकटांवर मात करत देशी वाणांची जपणूक केली. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढणे, त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देणे, त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे. अशा पद्धतीने तिच्या कामाचा विस्तार वाढला आणि ती एक बँकर बनली. बीजबँकर, गावरान वाणांची माता, बीज माता, सीडमदर बनली. ती सीडमदर म्हणजेच राहीबाई पोपरे होय.
*ज्या वयात नातवंडाबरोबर बसून खेळायचं, त्याचं वयात केवळ आपल्या नातवंडांसाठीच नव्हे, तर साऱ्या जगाच्या भविष्याची तरतूद करत होत्या. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, आपला निर्धार सोडला नाही.
"आपल्या विचारांचं वाण दर्जेदार असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर "पेरलेलं उगवणारच." अर्थात इरादा पक्का असेल आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल. तर, आपण आपले ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतो. हाच संदेश राहीबाई यांच्या आजवरच्या प्रवासातून मिळतो.
राहीबाई यांच्या कामाची महती, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेली. 2018 साली बीबीसीने 100 प्रेरणादायी महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला. त्याच वर्षी भारत सरकारकडून त्यांना "राणी लक्ष्मीबाई नारी शक्ती" हा पुरस्कार देऊन सन्मान केला. शिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

No comments:
Post a Comment